मुख्यमंत्र्यांनी भ्रमात राहू नये, अर्णबच्या अटकेवरून चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

Chandrakant Patil

नागपूर : तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची बंद केलेली फाईल पुन्हा उघडी करून अर्णव गोस्वामी यांची अटक करणे म्हणजे राज्य सरकारची ठोकशाही आहे. गोस्वामी यांची अटक म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्याचे काम आहे. राज्य सरकारने चालवलेली डपशाही ही आणीबाणी असल्यासारखं वाटत आहे. हम बोले सो कायदा, काहीही केलं तरी चालतं या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहू नये, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. आज सकाळी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर पाटील यांनी प्रथम कार्यकर्त्यांसमवेत भाजपच्या नागपूर येथील विभागीय कार्यलयासमोर निषेध नोंदवत सरकारविरोधात आंदोलन केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारचा चांगलाच संचार घेतला.

यावेळी पाटील म्हणाले की, एका मोठ्या टीव्ही चॅनलच्या संपादकाला तुम्ही फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधं देऊ द्या, मग निघूया. पण ते एकलं जात नाही. या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. अर्णव यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार कुठलीतरी संधी शोधत होतं. त्यातूनच ही कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असूद्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही. नाईक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांना आज ज्याप्रकारे अटक झाली आहे ते निषेधार्ह आहे. असेही ते म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली, त्याचा आम्ही निषेध करतो. जो पर्यंत अर्णब गोस्वामी यांची सुटका होणार नाही तोपर्यंत भाजप कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला निषेध नोंदवेल. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात, पण महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

गोस्वामी यांच्या अटेकवर ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’ अशी खोचक टीका परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. तर अर्णव गोस्वामी आमचा पोपट नाही, आम्ही पोपट पाळत नाहीत. पोपट तेच पाळतात असा प्रत्यारोप पाटील यांनी केला.

आज राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. ऑनलाईन परीक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. असे कितीतरी प्रश्न आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार या सगळ्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे कुरापती करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER