मुख्यमंत्री शिवसेनेचा तरीही कामं होत नाहीत; शिवसेना मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे गा-हाणे

CM Uddhav Thackeray
  • अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवं ते देतात; शिवसेना मंत्र्यांची कुरबुर
  • काँग्रेस-राष्ट्रवादी मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांसबंधी कामे गतीने होत नाहीत

मुंबई : पारनेरचे नगरसेवकांचे नाराजी नाट्य सुरू असतानाच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनीही कुरबूर सुरू केली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवं ते देतात. आम्हाला मिळत नाही, अशी कुरबूर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र ही एक आढावा बैठक असल्याचे माध्यमांना सांगितले होते.

बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी तक्रारीचा सूर लावत मुख्यमंत्र्यांपुढे आपली गा-हाणी मांडलीत. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आमच्या जिल्ह्यातील विकासकामे होत नाहीत.आवश्यक असलेले अधिकारी बदलून मिळत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री जिथे आहेत तिथे त्यांना हवे असलेले जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते. काँग्रेस-राष्ट्रवादी मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांसंबंधी कामे गतीने होत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात बसून त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांकडून आवश्यक असलेल्या कामांचा निपटारा करतात.

त्यांच्या पालकमंत्र्यांना आवश्यक जिल्हाधिकारी- इतर अनेक अधिकारी झटपट बदलून मिळतात. मात्र आमच्याबाबत तसे होत नाही. काही मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्याविरोधातही नाराजी व्यक्त केली.  मुख्य सचिवपदी असताना गेल्या सहा महिन्यांत अजोय मेहता यांनी आम्हाला हवा असलेला एकही जिल्हाधिकारी-सनदी अधिकारी बदलून दिला नाही. मेहता संघटनेशी संबंधित नसताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात ठेवण्यामागचे कारण काय आहे ? असे प्रश्न शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित केले व उत्तरे मागितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यानेच मी अजोय मेहता यांना मुख्यमंत्री कार्यालयात ठेवले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे काम चांगले चालले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना आवश्यक असलेल्या कामांनाही आता गती देणार, असे उत्तर मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER