मुख्यमंत्र्यांचा मातोश्रीवरून तर पवारांचा ग्राउंड लेव्हलवरून आढावा

CM Thackeray & Sharad Pawar

मुंबई :- एकीकडे कोरोना (Corona) साथीचा कहर तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. कालपासूनच मुंबईसह उपनगराला जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुंबईसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून (Matoshree) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई महापालिका आणि इतर आपत्ती निवारण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी थेट मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्यातील सद्य:स्थिती, आर्थिक, सामाजिक घडामोडी आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री मातोश्रीवरून राज्याच्या परिस्थितीवर लक्ष घालत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार मुसळधार पावसातही मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्ष घालतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या आढावा बैठकीत पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विधानपरिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यभरातील पावसाची स्थिती, कोरोनाची स्थिती, शेतीबद्दलची स्थिती जाणून घेऊन महत्त्वाच्या सूचनाही केल्या. तसेच रात्री उशिरा यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडत मुंबईत पडत असलेल्या पावसाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी मंत्रालय परिसरातील पाहणीही केली.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मात्र मातोश्रीच्या बाहेरही निघाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER