सीएमसाहेब, मराठा-ओबीसी सहमती घडवा…

Shailendra Paranjapeकरोनाची (Corona) दुसरी लाट अटोक्यात आलीय. किमान ती आता यापेक्षा खूप काही पसरणार नाही, याचा अंदाज सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना आलाय. त्यामुळे आता करोनावरच्या टीकेचा जोर कमी झाला असून आता टीकाटिप्पण्या राजकीय सामाजिक विषयांवरून सुरू झाल्यात. सर्वात हॉट टॉपिक अर्थातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (Maratha-OBC Reservation) आहे.

मुळात भारतीय घटनेचे शिल्पकार आणि द्रष्टे सुधारक, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी आरक्षणाचा दर दहा वर्षांनी फेरविचार करावा, हेही सांगून ठेवले होते. पण महान नेत्यांचे सोयीचे ते घ्यायचे, हेच आजवर केले गेल्याने त्या सगळ्या नेत्यांना अनावश्यकपणे विभूतीपण देवत्व दिले गेले. आपल्या समाजाला आपल्यासाठी लढणारा जंजीरमधला अमिताभ, गो रा खैरनार, अण्णा हजारे (Anna Hajare) असे आदर्श लागतात म्हणजे आपली सोय होऊन जाते. त्यांच्यावर आपल्यासाठी लढायची जबाबदारी टाकून दिली की आपण निवांत घरी झोपा काढायला मोकळे.

जंजीरमधेच अमिताभच्या तोंडी एक उद्विग्न मनस्थिती दर्शवणारा संवाद आहे. बाहेरचं जग कितीही क्रूर असलं तरी आपल्याला काय फरक पडतो, आपण आपल्या घराचे दरवाजे बंद करून घ्यायचे आणि खिडक्यांचे पडदे लावून टाकायचे, की झालं. आपल्या सर्वांची स्थिती आज जया भादुरीने व्यक्त केलेल्या अपेक्षेशी परफेक्ट जुळणारी झालीय. त्यामुळे राज्यात लाखालाखाचे मोर्चे निघोत, राज्यात बलात्कार-खून होवोत, गुन्हेगारी वाढो…मला काय फरक पडतो. माझा या सर्व घटनांशी मैलोनमैल संबंध येत नाही, ही फुशारकी मारण्यात पांढरपेशे उच्चभ्रू मग्न आहेत.

त्यांचा दावा तार्किक आणि बरोबरही वाटतो. आम्ही का पडावं या सगळ्यात. एकतर आरक्षणामुळे खुल्या वर्गाच्या जागाच कमी होत चालल्यात. मग मुलांना उत्तम मार्क मिळवा, सरळ अमेरिकेला निघून जा, काय ठेवलंय इथं. सगळीकडे भ्रष्टाचार. पेपरात काय वाचायचं तर खून दरोडे आरक्षणाचे वाद. त्यापेक्षा साता समुद्रापार जा.

बिहारमधे ३० वर्षांपूर्वी १९९० च्या दशकात लालू प्रसाद यादव नावाच्या महान व्यक्तिमत्त्वाने फॉल्स सेन्स ऑफ एम्पॉवरमेंटचे निवडणूक गिमिक करत आणि नोकरशाहीला अक्षरशः घरगड्यासारखे राबवत बिहारचा नरक केला. त्या काळात बिहारमधे मुलगा सातवी आठवी नापास झाला किंवा सुदैवाने पदवीधर झाला तर प्रत्येक आई सांगत असे की बाबा इथे असुरक्षित आहे. तू आपला मुंबई गाठ. बिहारहून मुंबईकडे उगाच नाही इतक्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या.

सांगायचा मुद्दा हा की आपली अवस्था २५ वर्षापूर्वीच्या बिहारसारखी होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालायला हवे. आरक्षणामुळे मंडल कमिशनच्या दृष्य परिणामांमुळे अनेक उच्चवर्णीय तरुण आरक्षणाचे फटके ऐन बारावीत बसल्याने भलते जातीयवादी आणि खालच्या जातींचे द्वेष्टे होत गेलेत. त्यामुळे हे सारं कुठे तरी थांबायला हवं. राम मंदिरासाठी दोन समाज एकत्र येऊ शकतात तर महाराष्ट्राचं समाजमनं एकसंध राहण्यासाठी आणि प्रतिभासंपन्न प्रज्ञावंत तरुण महाराष्ट्रातच राहण्यासाठी आपण सर्वांना एकत्र बसवून पाच पाच पावलं मागं यायला का लावू शकत नाही.

त्याही पलीकडे सर्व समाजांमधल्या गरीबांना आरक्षण द्यावं ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), भाजपा यांची भूमिका आता सर्वच पक्षांची आहे. त्यामुळे त्याचाही विचार करावा पण त्यातून पुन्हा कलह होत असतील तर मराठा ओबीसी सर्वांना एकत्र बसवून सर्वमान्य तोडगा काढावा जेणेकरून या प्रश्नावर कोणीही कोर्टात जाणार नाही, हेही ठरवून टाकायला हवे. एखादी जटिल समस्याही संवादातून सुटू शकते, हे मुख्यमंत्र्यांनी (CM) त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचे दर्शन घडवून सिद्ध करावे.

करोना (Corona) दुसरी लाट ओसरतेय या बरोबरच मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल, हे शुभवर्तमानही धडकलेय. चला नवी सुरुवात करायची वेळ जवळ येत चाललीय.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button