उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पण प्रश्न घेऊन लोक का जाताहेत राज ठाकरेंकडे?

CM Uddhav Thackeray-Raj Thackeray.jpg

मातोश्री आणि कृष्णकुंजमध्ये तसे चार किलोमीटरचे अंतर आहे. मातोश्री हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा बंगला वांद्रेमध्ये तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा कृष्णकुंज बंगला आहे दादरच्या शिवाजी पार्कजवळ. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळातही राज ठाकरेंच्या बंगल्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यांचे चुलत बंधु राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण लोक प्रश्न घेऊन जाताहेत ते राज यांच्याकडेच. राज यांच्या पक्षाचा केवळ एक आमदार आहे. विधानसभेतील २८८ आमदारांमध्ये एक आमदार म्हणजे जवळपास नगण्य अस्तित्व. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून गेले होते पण त्यातील एकच पक्षात राहिला आणि बाकीचे शिवसेनेत गेले. नाशिक महापालिकेतील मनसेची सत्ता केव्हाच गेली आणि पुणे महापालिकेतील सद्दीदेखील संपली.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत लावा रे तो व्हिडीओ म्हणत राज यांनी जागोजागी सभा घेतल्या. सभांना प्रचंड गर्दी झाली, टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला पण स्वत: मनसेने एकही जागा लढविली नाही. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले. मनसे स्वबळावर लढली पण एकच्या पुढे जाऊ शकली नाही. राज ठाकरे यांच्या धरसोड भूमिकेचे सोशल मिडियात काही काळ हसेदेखील झाले. आता सगळ्यांना वाटले राज ठाकरेंचे राजकारण संपले पण लॉकडाऊनच्या काळात राज यांच्याबाबत वेगळाच अनुभव येतोय. दारुची दुकाने सुरू करा, राज्याचा महसूल बुडतोय असा आवाज राज यांनी उठविला आणि काही दिवसात दारू उत्पादन आणि विक्री सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठी, हिंदी चित्रपटांचं शूटिंग सुरू करा, असं साकडं या क्षेत्रातील दिग्गजांनी राज यांना भेटून घातलं आणि राज यांच्या आवाजानंतर काहीच दिवसात शूटिंग सुरूदेखील झालं.

सरकारने पुनश्च हरिओम अंतर्गत दुकाने तर सुरू केली पण ‘आॅड-इव्हन’ पद्धतीने. राज यांनी या बाबीचा समाचार घेतला आणि सर्वच दुकाने खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून डबे ने-आणण्याची सुविधा द्या ही मागणी घेऊन डबेवाले कृष्णकुंजवर पोहोचले आणि त्यानंतर काहीच दिवसात डबेवाल्यांसाठी लोकल खुली झालीदेखील. मुंबईच्या डोंगरी भागात मुस्लिम आणि परप्रांतिय मच्छिमारांनी स्थानिक मराठी मच्छिमारांच्या व्यवसायावर गदा आणली आहे. मराठी मच्छिमारांनी कृष्णकुंजवर जाऊन कैफियत मांडली. स्टेज आर्टिस्टचं शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वी कृष्णकुंजवर गेलं होतं. आमचा धंदा वांद्यात आहे, मदत करा म्हणून विनंती करून गेलं. एकदोन दिवसांत राज्यभरातील बँडवाल्यांचे प्रतिनिधी जाणार आहेत.

वीज मंडळानं लाखो वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यांची अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविली. वीज ग्राहकांचा आक्रोश पोहोचला तो कृष्णकुंजवरच. राज ठाकरे गरजले, वीज ग्राहकांना नाडणाऱ्यांना सरळ करू. लगेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज ग्राहकांना कुठला दिलासा देणार हे सांगण्यासाठी कृष्णकुंजवर पोहोचले. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. राज ठाकरेंमध्ये काही तर असे आहे की ज्यामुळे कुठलीही सत्तास्थान ताब्यात नसताना या नेत्याकडे लोक गाऱ्हाणी घेऊन जाताहेत. सत्ता असो नसो हा माणूस त्याच्या बुलंद आवाजाने आपल्याला न्याय देऊ शकतो असा सामान्यांना विश्वास आहे. या विश्वासानेच राज यांचे नेतृत्व टिकवून ठेवले आहे. ठाकरे परिवाराने स्वत:कडे वर्षानुवर्षे सत्ता घेतली नाही. उद्धव ठाकरे यांनी ती परंपरा मोडली. राज यांनी ती अजूनही कायम ठेवली आहे. सत्तेबाहेरचे सत्ताकेंद्र म्हणून त्यांची विश्वासार्हता कायम आहे.  राज आपल्या मनातील बोलतात असे लोकांना वाटते. त्यांच्या शब्दांची जादू अजूनही चालते, त्यांचे बोलणे गांभीर्याने घ्यावेच लागते याची प्रचिती या निमित्ताने येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER