पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या; पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

CM Fadnavis-PM Modi

नाशिक :- महाराष्ट्र हा गुजरातचा लहान भाऊ आहे. कधीकाळी आपण एकाच पानात जेवत होतो. दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी १ मे रोजी झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा अद्भुत विकास होणे अपेक्षित होते. परंतु या आधीच्या सरकारच्या घराणेशाही, स्वकीयांचेच हित जपण्याने राज्याचा विकास खोळंबला; मात्र गेल्या पाच वर्षांत  देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ऊर्जावान मुख्यमंत्र्यांच्या विकासाभिमुख ध्येय धोरणे आणि कामाप्रती निष्ठेने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेले आहे.

तसेच, आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणतेही सरकार पाच वर्षे चालले  नाही; परंतु एकमेव वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच पाच वर्षे सतत महाराष्ट्राची सेवा केली. अशा ऊर्जावान मुख्यमंत्र्यांना आपण पुन्हा एकदा आशीर्वाद द्या आणि पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार दिलं. पूर्ण बहुमताशिवाय फडणवीस सरकारने प्रगतिशील, विकसनशील राज्य दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे  केलेल्या कामाचं रिपोर्ट कार्ड तुमच्यासमोर ठेवलं आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये; महाजनादेश यात्रेचा समारोप

आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या. उज्ज्वल, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी फडणवीस यांना आपण आशीर्वाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. भारताची परंपरा राहिली आहे. देवी-देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या दैवतांकडे मागणं मागण्याची, आशीर्वाद मागण्याची. तशी भाजपची परंपरा आहे, यात्रा काढण्याची. ही यात्रा कोणत्या देवांसाठी तर जनता हेच आमच्यासाठी देव आणि तेच आमचं दैवत. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही यात्रा काढली आणि आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा लेखाजोखा आपल्यापुढे मांडला. या यात्रेत सहभागी होऊन थोडं पुण्य  माझ्या पदरात पाडून घेण्यासाठी आज मी आपल्यात उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेनंतर त्यांना नमन करण्यासाठी इथे आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, यावेळी उदयनराजे भोसलेंनी साताऱ्याची पगडी मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं आहे.

त्या  पगडीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, उदयनराजेंनी मला ही पगडी घातली, हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि छत्रपतींच्या कार्याशी एकनिष्ठ राहण्याची जबाबदारीही आहे. आशीर्वाद द्या, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. या भव्यदिव्य समारोप कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, बीडच्या आमदार पंकजा मुंडे, एकनाथ खडसे मंचावर उपस्थित होते.