पाच वर्षाचा मुलगाही सांगतो सरकार महायुतीचं येणार – देवेंद्र फडणवीस

CM Fadnavis

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षातील नेते तयारीला लागले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पक्षाच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत . पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे बारड येथे प्रतिपादन  

कणकवली येथे नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’पक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये विलीन झाला . “हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. पण सिंधुदुर्गातील लोकांचं कणकवलीत प्रवेश व्हावा असं म्हणणं होतं त्यामुळेच येथे प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तसेच फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला .देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असेही मुख्यमंत्री म्हणाले . तसेच राज्यात पुन्हा भाजपचीच सरकार येणार असल्याचे ते म्हणाले . “ही निवडणूक प्रेमाने, जनतेसोबत लढली पाहिजे असं सांगताना अनेक लोक चिथवण्याचा प्रयत्न करतील. जे जिंकणारे असतात त्यांनी वाघासारखं, मोठ्या मनानं वागायचं असतं,असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले .