मुख्यमंत्री ठाकरे ,उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘संक्रमण अर्थात बदल होताना परस्परांचा आदर करा, असं निसर्ग शिकवतो. आज मकर संक्रांत, त्यामुळे या संक्रमणातूनही असाच बदल होत असताना आव्हांनांवर मात करण्याची प्रेरणा घेऊ या. परस्परांप्रती आदर भाव, प्रेम, जिव्हाळा वाढवू या. राज्यातील जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..‌

‘तिळगुळ घ्या गोडगोड बोला..!’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

“सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान, असत्य, अंधश्रद्धेचा अंधकार यानिमित्ताने दूर होवो. मनातील, विचारातील कटुता संपून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. कोरोना लस आगमनाच्या शुभवार्तेनं साजरी होत असलेली यंदाची मकर संक्रात राज्यासाठी कोरोनामुक्तीची पहाट ठरो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मकर संक्रांतीच्या दिवशीच पोंगल, बिहू आणि उत्तरायण पर्व हे सणही आज साजरे केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असलेल्या या सणांच्याही सर्वांना शुभेच्छा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच साजरे होत असलेले हे सण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरे करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER