राज्यात उद्या रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Thackeray

मुंबई :- महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदीची घोषणा केली. अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळता सर्वच गोष्टी बंद राहतील अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम परिसरातच मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल. गेल्या वर्षीही आपण पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा म्हणालो होतो की पुढचा गुढी पाडवा कोविडमुक्त असू दे. मधल्या काळात तशी परिस्थिती आपण नक्कीच निर्माण केली होती. फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवर नियंत्रण मिळवलं होतं. जिंकत आलेल्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. भयानक पद्धतीने रुग्णवाढ झाली आहे. आजचा आकडा आजपर्यंतचा सर्वात जास्त आहे. ६० हजार २१२ रुग्ण राज्यात सापडले आहेत. ही भितीदायक परिस्थिती आहे.

प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही.

आपल्याला आता चर्चा परवडणारी नाही. कारण हा कालावधी आपल्या हातातून गेला, तर आपल्याला कुणी वाचवू शकणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाहीयेत. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. काही कारखान्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देखील करायला सुरुवात केली आहे. पण इतर कंपन्यांकडून ऑक्सिजन आपल्या राज्यात आणणं कठीण आहे.

राज्यातली ही परिस्थिती मी पंतप्रधानांना देखील सांगितली आहे. त्यांच्याकडे रोजच्या रोज अहवाल जातो आहे. आपण पारदर्शीपणे सगळ्या गोष्टींना धाडसाने तोंड देत आहोत. काहीही लपवत नाही आहोत. उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला ३ महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करणार आहे. त्याशिवाय, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्ती जाहीर होतात. करोना या नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच इतर आपत्तींप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आलंय त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करतोय.

ब्रिटनने अडीच ते तीन महिने लॉकडाऊन लावून जवळपास ५० टक्के जनतेला लसीकरण केलं. आत्ताचं तिथलं चित्र म्हणजे रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल, लसीकरण वाढवावं लागेल. जेणेकरून पुढची लाट आपण थोपवू शकू.

आपण एकदा कोविडवर नियंत्रण मिळवून दाखवलं. पण यावेळी चित्र वेगळं आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडताना आपल्याला दिसत आहे. आपण जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणार आहोत. पण ही रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा वापर जास्त करावा लागतोय. त्यामुळे बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. ती वाढवण्यासाठी आपण शक्य ते सगळं करत आहोत. पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. मी फेसबुकवरून तुमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करत आहे. आणि त्यांना पत्र लिहूनही मागणी करणार आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना मी आवाहन करतोय, की तुम्ही सगळ्यांनी मदतीला, लढायला पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना आवाहन करतो की जे काही तुम्ही करू शकाल आणि जे शक्य आहे ते करण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या. ही उणीदुणी काढण्याची वेळ आहे. सर्व राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे. आता उणीदुणी काढत बसलो, तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पंतप्रधानांनाही मी हीच विनंती केली की देशातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आवाहन करा की राजकारण बाजूला ठेवा. आपण एकसाथ लढायला हवं, तरच आपल्याला या साथीवर नियंत्रण मिळवता येईल.

कोव्हिडसाठी 3300 कोटी तात्काळ निधी म्हणून उपलब्ध. सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार. पटकन रुग्ण आला तर विचारत बसायचं नाही, निर्णय घ्या आणि उपाय करा

५४०० कोटी रुपयांची मदत जाहीर…

राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत. संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार आहोत. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत.

अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या ५ लाख आहे.

रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या १२ लाख आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब २००० रुपये देत आहोत. त्यांची संख्या १२ लाख आहे.कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी ३३०० कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजुला काढून ठेवत आहे, यासाठीही मुख्यमंत्री म्हणाले.

Check Online PDF : Break The Chain 13 April 2021

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button