क्लस्टर आणि परमार आत्महत्या प्रकरण विधानसभा निवडणुकीत ठरतोय प्रचाराचा मुद्दा

thane news

ठाणे : क्लस्टरच्या मुद्यावरुन मागील काही महिन्यांपासून वादळ घोगांवत असतांनाच ही योजना किती फायदेशीर याचा महापालिका, राजकीय नेते आदींकडून उहापोह झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत याच मुद्यावरुन विरोधात आणि बाजूने अशा दोन्ही पध्दतीने प्रचार तापला आहे. तर ओवळा माजिवडा मतदार संघात परमार आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही आता पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून विकासाचे मुद्दे बाजूला ठेवत याच विषयावर सध्या जोरदार वादळ उठले आहे.

मागील कित्येक वर्षापासून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देणारी योजना म्हणजेच क्लस्टर मंजुर झाली. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्यात सहा भागात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु गावठाण, कोळीवाडे यावरुन सुरवातीला वादळ उठले होते. ते शांत होत नाही तोच या योजनेत हक्काचे घर नाही तर लीजवर घर मिळणार म्हणूनही ठाण्यातील दक्ष नागरीकांनी आवाज उठविला होता. परंतु विधानसभा निवडणुका लागण्याच्या दोन दिवस आधीच सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने क्लस्टर योजनेला अंतिमत: मंजुर देण्यात आली असून पहिला प्रकल्प किसनगर भागात राबविला जाणार असल्याचे जाहीर केले. वास्तविक पाहता, विधानसभा निवडणुकीआधीच या योजनेचा नारळ वाढविला जाणार होता. मात्र त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, आणि हे स्वप्न ठरणार अशी चर्चाही सुरु होती. त्यामुळे सत्ताधा:यांनी ही योजना मंजुर झाल्याचे सांगत तोच प्रचाराचा प्रमुख मुद्दा तयार केला. शिवाय यामध्ये रहिवाशांना हक्काचे घर मिळणार असून 323 चौरस फुटांचे ते असणार असल्याचेही जाहीर केले.

एकूणच ही योजना किती फायदेशीर आहे, याचे भांडवल करण्याचे काम सत्ताधा:यांकडून सुरु असून प्रचाराचा हाच प्रमुख मुद्दा तयार केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी सुध्दा हा मुद्दा प्रचाराचा एक भाग केल्याचे दिसून आले होते. ठाणो, कोपरी – पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि मुंब्रा कळवा या मतदार संघातही याच मुद्याचे भांडवल केले जात आहे. याच मुद्यावर मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दुसरीकडे मात्र सत्ताधारी डोळ्यात धुळ फेक करीत असल्याचा आरोप करीत क्लस्टर योजना कशी चुकीची आहे, ती कोणाच्या फायद्याची आहे, अमुक एक भागातच ती योजना का राबविली जात आहे, याचा उहापोह विरोधकांकडून सुरु झाला आहे. अपक्ष उमेदवारही याच मुद्यावरुन सत्ताधा:यांना टारगेट करीत आहेत.

दुसरीकडे आता महापालिका निवडणुकीपाठोपाठ परमार आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत गाजण्यास सुरवात झाली आहे. परमार आत्महत्या प्रकरणात ठाण्यातील चार नगरसेवकांची नावे पुढे आली होती. सध्या ते चारही जामीनावर बाहेर आहेत. त्यानुसार या चौघांनीही 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत आपआपल्या पक्षाकडून तिकीट मिळविले होते. त्यातील तिघे पुन्हा निवडून आले तर एकाचा पराभव झाला. त्यानंतर आता पुन्हा यातीलच एक नगरसेवक आता विधानसभा निवडणुक लढवित असून त्याला इतर दोघांचाही पाठींबा मिळत आहे. त्यामुळे पुन्हा हा मुद्दा लावून धरत आत्महत्या प्रकरणात दोषारोप ठेवण्यात आलेल्यांनाच पक्ष कसा तिकीट देतो, त्याला आपण निवडून देणार का? असा प्रचार आता ठाण्यातील एका मतदार संघात सुरु झाला आहे.

एकूणच विकास कामे, समस्या, रस्ते, खड्डे, पाणी, मुलभुत सोई सुविधा आदी महत्वाचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बाजूला झाले असून नको त्या मुद्यांचे भांडवल करुन निवडणुकीचा रंग बदलण्याचा प्रयत्न सध्या सर्व पक्षीयांकडून केला जात असल्याचेच चित्र दिसत आहे.