देशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध, अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये

Riteish Deshmukh in Karad for funeral

कराड : काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. विलासकाका उंडाळकर यांनी विलासरावांच्या कार्यकाळात मंत्रिपद भूषवल्यामुळे देशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते.अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्यासह भाजप (BJP) नेते आणि मेहुणे अतुल भोसलेही (Atul Bhosale) अंत्यदर्शनाला उपस्थित राहिले होते.

माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे राजकारणा व्यतिरिक्त घनिष्ठ संबंध होते. अनेक वेळा विलासकाका हे विलासराव देशमुख यांच्या घरी उपस्थित असत. त्यामुळेच रितेश देशमुख आणि विलासकाका उंडाळकर यांची ओळख घट्ट होत गेली.

कराडमधील भोसले कुटुंबीयांकडे दोन दिवसापासून पाहुणे म्हणून आलेल्या रितेश देशमुख यांना विलासकाका यांच्या निधनाची बातमी समजली, तसे ते विलासकाकांच्या अंतिम दर्शनासाठी आले. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबा भोसले हे उपस्थित होते. अंतिम दर्शनानंतर अभिनेता रितेश देशमुखने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचं सांत्वन करुन ते निघून गेले.

विलासकाका पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्ष विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांनी सहकार क्षेत्रातही मोठे काम केले. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या.

विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना विलासकाका उंडाळकरांनी 1999 ते 2003 या काळात विधी, न्याय आणि पुनर्वसन मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. ते कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेले नेते म्हणून त्यांची ओळख होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER