रस्ता मोकळा करा ! शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव

Heavy Police presence seen at Singhu border

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत आयोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये (Kisan Tractor Rally) झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. दिल्लीच्या सीमेवर रस्ता अडवून बसलेल्या शेतकऱ्यांविरुद्ध स्थानिकांनी आवाज उठवणे सुरू केले. दिल्ली-हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आज सकाळपासून स्थानिक नागरिक जमले व त्यांनी शेतकऱ्यांना येथील रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा, असा इशारा दिला. यावेळी सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठी  घोषणाबाजी झाली.

रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार स्थानिकांनी केली. शुक्रवारपर्यंत रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा इशारा दिला आहे. २६ जानेवारीला जे घडले ते सहन करता येण्याजोगे नाही. आतापर्यंत आम्ही यांना शेतकरी समजत होतो. मात्र आता सत्य परिस्थिती आमच्यासमोर आली आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये स्थानिक दुकानदारही आहेत. सिंघू बॉर्डर रिकामी करा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांनी तिरंगाही सोबत आणला होता. सिंघू बॉर्डरवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. लोकांना फेऱ्याने जावे लागते. दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, बुधवारी रेवाडीमध्ये अनेक गावांतील लोक पंचायतींचे आयोजन केल्यानंतर आंदोलक आणि स्थानिक आमने-सामने आल्याने पोलीसही चिंतेत पडले होते. स्थानिकांचे पारडे जड दिसू लागल्यानंतर रस्ता अडवून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी तिथून काढता पाय घेतल्याने अनर्थ टळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER