अजित पवार-हसन मुश्रीफ यांना बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट

hasan mushrif-ajit pawar

मुंबई :  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे.

महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई हायकोर्टात काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरु होती.

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची नावे होती.

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.

अखेर आता सहकार विभागानेही या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.

यापूर्वी एसआयटीनेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील 75 जणांना क्लीन चिट दिली होती.

मुंबईच्या सेशन्स कोर्टात काही दिवसांपूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. आता सहकार विभागाच्या अहवालातही अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER