मिरजोळ्यात दोन गटांची जुंपली, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

clash in two groups

रत्नागिरी/प्रतिनिधी :- गाडीच्या आवाजबद्दल तक्रार केल्यामुळे मिरजोळे पाटीलवाडीतील तरुणाने आपल्याला धमकी दिली तर आपल्या दोन मुलांना दगडाने दुखापत करत ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शरद गोपाळ पाटील (६०, रा. मिरजोळे, पाटीलवाडी, ता. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. तर जुन्या घरी देवाची पूजा करून परत जाताना शरद पाटील यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी आपल्याला हाताने, बांबूने व सुरी फेकून मारल्याने दुखापत झाल्याची परस्परविरोधी तक्रार शुभम सुजन पाटील (२२, मिरजोळे) यांनी पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

ही बातमी पण वाचा : मुलाच्या मृत्यु प्रकरणी पित्याची न्यायालयात धाव

याबाबत शरद पाटील यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आपण व साक्षीदार संदीप कृष्णा पाटील यांच्यासह सायंकाळी रस्त्यालगतच्या बाकड्यावर बसलो होतो. त्यावेळी आरोपी शुभम सुजन पाटील (२३, रा. मिरजोळे पाटीलवाडी) हा बुलेटवरून तेथे आला व वडिलांकडे तक्रार का केली, अशी विचारणा आपल्याला केली. त्यावरून त्याने शिवीगाळ करून वाद सुरू केला. त्यानंतर शरद पाटील यांची मुले सुयोग व सुजित यांना दगडाने दुखापत केली. यावेळी गावातील लोकांनी एकत्र येऊन हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. शुभम याने सुजन सुभाष पाटील (४८), सुजन पाटील यांची पत्नी, आर्या पाटील व सिमरन पाटील (सर्व रा.मिरजोळे पाटीलवाडी, ता. रत्नागिरी) या चौघांना बोलावून, हातात लाकडी दांडका घेऊन बेकायदा जमाव केला व शरद पाटील यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली, असे शरद पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी या पाचजणांविरोधात भारतीय दंडविधान कलम १४३, १४७, ३२४, ५०४, ५०६ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

शुभम पाटील यांनी दाखल केलेल्या परस्परविरोधी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ते व श्रध्दा पाटील हे जुन्या घरी दिवाबत्ती व देवाची पूजा करून त्यांच्या राहत्या घरी जात असताना आरोपी शरद पाटील व सहकारी यांनी शिविगाळ केली. त्याबाबत विचारणा केली असता संगनमताने त्यांनी फिर्यादी शुभम पाटील व श्रध्दा यांना हाताच्या थापटाने मारून अन्य दोन आरोपींनी बांबूने व सुरी फेकून मारले व दुखापत केली. अंगावरील कपडे फाडून नुकसान केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ४२७ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) चा भंग कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.