जॉन अब्राहमच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी लोकांनी केली दगडफेक

जॉन अब्राहमने (John Abraham) त्याच्या नव्या मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते 2’ सिनेमाचे उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच शूटिंग पूर्ण केले आणि सध्या तो त्याच्या नव्या अटॅक (Attack) सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

या सिनेमाचे दिल्लीत शूटिंग सुरु आहे. जॉनच्या इमेजप्रमाणे हा सिनेमासुद्धा अॅक्शनपॅक्ड असून जॉन यात स्टंट करताना दिसणार आहे. असेच एक स्टंट करताना तो जखमीही झाला होता. तरीही त्याने शूटिंग सुरु ठेवले आहे. पण दोन दिवसांपूर्वी त्याच्या सेटवर शूटिंग सुरु असताना बघ्यांनी हंगामा झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले होते. पोलीस आले आणि त्यांनी हंगामा करणाऱ्यांना हाकलले तेव्हा कुठे सिनेमाचे पुन्हा शूटिंग सुरु झाले.

शनिवारी जॉन अब्राहमने धनीपुर विमानतळाच्या रनवेवर स्टंट सीनचे शूटिंग सुरु केले होते. रविवारीही शूटिंग सुरु होते. शूटिंग सुरु असल्याची माहिती मिळताच रविवारी दुपारी शूटिंग पाहाण्यासाठी आजूबाजूच्या गावातील अनेक ग्रामस्थ विमानतळाजवळ पोहोचले होते. विमानतळाचे गेट बंद करण्यात आले असल्याने ग्रामस्थांना शूटिंग दिसत नव्हते. ग्रामस्थ शूटिंगसोबतच जॉनला जवळून पाहायचे होते त्यामुळे त्यांनी संरक्षक भिंतीवर चढून रनवेवर जाण्याचा प्रयत्न सुरु केला. शूटिंगमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर बाऊंसर्स तैनात करण्यात आले होते. या बाऊन्सर्ससोबत ग्रामस्थांचा वाद झाला. या वादातून ग्रामस्थांनी आरडाओरड करीत सेटवरील लोकांवर दगडफेक सुरु केली. बाऊन्सर्सनीही लोकांवर दगडफेक सुरु केल्याने वाद वाढला. आरडाओरडा सुरु झाल्याने शूटिंग थांबवण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गांधी पार्क पोलीस स्टेशनमधून लगेचच काही पोलीस शूटिंगस्थळी आले आणि त्यांनी ग्रामस्थांना पिटाळून लावले. पोलिसांनी या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.

या सिनेमात जॉन सोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत सिंह यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन ‘एक था टायगर’ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला लक्ष्य राज आनंद करीत आहे. स्वतंत्ररित्या दिग्दर्शनाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सिनेमाची निर्मिती जॉन अब्राहम, जयंतीलाल गाडा आणि अजय कपूर करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER