कुतुबमिनार संकुलातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी दावा

भग्न देवालयांतील देवतांना केले पक्षकार

Qutub Minar

नवी दिल्ली : दिल्ली (Delhi) महानगर परिक्षेत्रात मेहरौली येथे असलेल्या कुतुबमिनार (Qutub Minar) संकुलातील ‘कुव्वत-उल-इस्लाम’ ही मशिद तेथे आधी असलेली प्राचीन हिंदू व जैन मंदिरे उद्ध्वस्त करून बांधली असल्याचे प्रतिपादन करणारा आणि या भग्न मंदिरांच्या पुनर्बांधणीची मागणी करणारा एक दिवाणी दावा राजदानीतील ‘साकेत’ न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

या भग्न मंदिरांतील हिंदूंच्या विष्णू आणि जैनांच्या तीर्थंकर ऋषभदेव या दैवतांच्या वतीने त्यांचे स्नेही या नात्याने हरिशंकर जैन, रंजना अग्निहोत्री व जितेंदर सिंग ‘विशेन’ यांनी हा दावा दाखल ेकला आहे. दिवाणी न्यायाधीश नेहा शर्मा यांच्यापुढे मंगळवारी हा दावा पहिल्या तारखेला आला असता पुढील सुनावणी २४ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली. वादी पक्षकारांसाठी विष्णू एस. जैन हे सर्वोच्च न्यायालयातील वकील काम पाहात आहेत.

दाव्यात असे प्रतिपादन करण्यात आले आहे की,त्याठिकाणी आधीपासून असलेली हिंदू व जैनांचीं २७ मंदिरे/ प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करून अथवा त्यांची नासधूस करून मुगल शासक कुतुबुद्दीन ऐबक याच्या आदेशावरून तेथे ‘कुव्वत-उल-इस्लाम’ मशिदीचे बांधकाम केले गेले.

मशिदीचे बांधकाम करताना आधीची अनेक मंदिरे पूर्णपणे न पाडता मंदिरांची अर्धवट मोडतोड करून तेच साहित्य मशिदीसाठी वापरले गेले, असे नमूद करून या दाव्यात असे म्हटले गेले आहे की, मशिदीच्या भिंतींवर, खांबांवर व छतावर गणेश, विष्णू, यक्ष, यक्षिणी, व्दारपाल, भगवान पार्श्वनाथ, भगवान  महावीर व नटराज इत्यादी हिंदू व जैन देवदेवतांच्या मूर्ती तसेच मंगल कलश, शंख, गदा, कमलपुष्प, श्रीयंत्र, घंटा इत्यादी त्या धर्मांची शूभदर्शक प्रतिकचिन्हे स्पष्टपणे कोरलेली दिसतात. मशिदीचा आतील व बाहेरील आकारही प्राचीन हिंदू व जैन मंदिरांच्या  वास्तुकलेशी मिळता जुळता आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने जागेवर जो माहितीफलक लावला आहे त्यात लिहिलेल्या मजकुरावरूनही आमच्या या म्हणण्यास पुष्टी मिळते, असे दावेदारांचे म्हणणे आहे.

तरी ज्या २७ देवतांची मंदिरे पाडून मशिद बांधली गेली आहे त्या तीर्थंकर ऋषभदेव, विष्णू, गणेश, शिव, देवी गौरी, सूर्यदेव, हनुमान यांच्यासह सर्वच देव-देवतांचा मंदिरांच्या पुनर्बांधणीचा व तेथे पुन्हा पूजा-अर्जा सुरु करण्याचा हक्क न्यायालयाने मान्य करून जाहीर करावा, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे.

ही वास्तू ‘राष्ट्रीय महत्वाचे स्मारक’ म्हणून जाहीर करण्यात आले असून ती भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. एक भग्न मंदिरसंकुलाच्या पुनर्बांधणीसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशीही दावा करणार्‍यांची न्यायालयास विनंती आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER