
नवी दिल्ली : अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयक (९ डिसेंबर)ला रात्री उशिरा लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने ३११ मतं पडली. तर ८० मतं ही विधेयकाच्या विरोधात पडली. विशेष म्हणजे या विधेयकाला आधी विरोध करणाऱ्या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान का केलं माहित नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दलवाई म्हणाले की, शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती. आम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होत. मात्र नंतर काय झालं माहित नाही. शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य झालं नाही.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकचा मुख्य उद्देश समाजात फूट पाडणे हा आहे. सध्या देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. बरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी अशा मुद्द्यांद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप हुसेन दलवाई यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे भारतीय राज्यघटनेला आव्हान असून हे विधेयक घटनाविरोधी आहे. विधेयक म्हणजे घटनेतील चौदाव्या कलमाचं उल्लघंन करणारं आहे भाजप भारतीय राजघटना मानत नाही. हे विधेयक संसदेत मंजुर झालं तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकेल असं मला वाटत नाही. धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली, त्यामुळेच सरकारला नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक मांडावे लागले,असंही हुसेन दलवाई यांनी म्हटलं.
नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी शिवसेनेच्या खासदारांचा मोदी सरकारला पाठींबा
यावेळी त्यांनी अमित शाहांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. भाजपला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास मुळात माहितच नाही. आज जे आमच्यावर आरोप करतांना दिसत आहेत, त्यांचे पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. तसेच ते स्वत: असण्याचा काही प्रश्नच नाही, कारण त्यावेळी त्यांचा जन्मही झाला नसेल. देशाच्या फाळणीला काँग्रेसने आणि महात्मा गांधींनी सातत्याने विरोध केला होता. आज जे बोलत आहेत त्यांनी ब्रिटीशांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. फाळणी ही दु:खद घटना आहे. फाळणीमुळे भारतातील मुस्लीमांचं सर्वात मोठं नुकसान झालं. भाजपला भारताला हिंदू राष्ट्र बनवायचा आहे. मात्र भारत धर्मनिरपेक्षच आहेत. भारतात पेशवाई निर्माण करण्याचं भाजपचं स्वप्न आहे, मात्र ते कधीही पूर्ण होणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.