अभिनव बिंद्राच्या जीवनावरील सिनेमा डब्यात बंद

anil-kapoor-and-harshvardhan

गेल्या काही दिवसांपासून खेळांवर विविध सिनेमांची घोषणा करण्यात येत आहे. त्यापैकी काही सिनेमे सुरु झाले आणि आता पूर्णत्वाकडेही चालले आहेत. भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या जीवनावरील सिनेमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली असून यात तापसी पन्नू मितालीची भूमिका साकारीत आहे. तापसीने नुकतेच राजस्थानच्या एका धावपटूच्या जीवनावरील ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचे शूटिंगही जवळ जवळ पूर्ण केले आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेटच्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारित 83 सिनेमा तयार असून तो पुढील एक-दोन महिन्यात रिलीज केला जाणार आहे. शाहिद कपूरचा क्रिकेटवर आधारित जर्सीही पूर्ण झाला असून तो लवकरच रिलीज केला जाणार आहे. धोनी, मिल्खा सिंह अशा काही खेळाडूंच्या जीवनावरील सिनेमेह तयार झाले आहेत. पण काही खेळाडूंच्या जीवनावर सिनेमाची घोषणा होते पण त्याचा सिनेमा सुरु होतोच असे नाही. भारताला नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू अभिनव बिंद्रा मात्र याबाबतीत कमनशिबी ठरला आहे. त्याच्या जीवनावर सिनेमाची घोषणा झाली पण आता हा सिनेमा डब्यात बंद करण्यात आल्याचे समजते.

‘एक थी डायन’ सिनेमाचे दिग्दर्शन करणाऱ्या कन्नन अय्यरने अभिनव बिंद्रा यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची घोषणा दोन-तीन वर्षांपूर्वी केली होती. सिनेमाची घोषणा झाली तेव्हा अभिनव बिंद्राची भूमिका रणबीर कपूर आणि त्याच्या वडिलांची भूमिका ऋषी कपूर साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हे दोघे या सिनेमात काम करू शकले नव्हते. त्यानंतर वरुण धवनला याबाबतीत विचारण्यात आले. पण त्यानेही नकार दिला. त्यानंतर कन्ननने अनिल कपूर आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांना अॅप्रोच केले. अभिनव बिंद्राच्या भूमिकेत हर्षवर्धन कपूर आणि अभिनवच्या वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर काम करणार होते. शूटिंगचे शेड्यूल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. पण आता बॉलिवूडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा आता डब्यात बंद करण्यात आला आहे.

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि हर्षवर्धन (Harshavardhana) यांनी अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये काम न करण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्याच सिनेमाचे काम सुरु केले आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी बाप-लेक सध्या राजस्थानमध्ये आहेत. ‘थार’ नावाचा हा सिनेमा असून यात या दोघांबरोबर फातिमा सना शेख दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज सिंह चौधरी करीत आहेत. राज सिंह चौधरीने अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. अनिल कपूरचा हा सिनेमा नेटफ्लिक्स वर रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER