सिडको अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

CIDCO

नवी मुंबई :- कामाचा बोझा तसेच वरिष्ठांचा त्रास याला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण खासगी क्षेत्रात वाढत आहे. अशीच एक घटना नवी मुंबई येथे उघडकीस आली आहे.

सिडकोच्या कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मयूर अगवणे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पत्नीच्या प्रसंगावधानाने त्यांचे प्राण वाचले. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मयूर यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेची फारशी चर्चा झाली नसली तरी त्यामुळे सिडको कर्मचारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे.

राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. परंतु त्याचबरोबर भ्रष्टाचाराविषयी चर्चेतही सिडकोचा क्रमांक वरचा राहिला आहे. प्रत्येक विभागात फोफावलेल्या भ्रष्टाचारी मनोवृत्तीमुळे आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. परंतु कोणी वाच्यता करायला धजावत नाही. मयूर अगवणे हे कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

ही बातमी पण वाचा : दुचाकी लावण्यास विरोध केला म्हणून जवानाला चोपले

कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. याच मनस्थितीतून त्यांनी आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास लावताना स्टुलचा आवाज आल्याने बाजूच्या रूममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी तातडीने मयूर यांच्या खोलीकडे धाव घेतली. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी पंख्याला अडकवलेली दोर कापून बेशुद्ध अवस्थेतील मयूर यांना खाली उतरविले. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून मयूर यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबानीत नमूद केले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सिडको वर्तुळात उमटले आहेत. हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये, या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस विभागाने म्हंटले आहे.