सिस्टर अभया खून खटल्यात ख्रिश्चन पाद्री व साध्वी दोषी

Sister Abhaya murder case
  • केरळमधील खटल्याचा २८ वर्षांनी निकाल

थिरुवनंतपूरम : रोमन कॅथलिक ख्रिश्चनांमधील सिरो मलबार चर्च या एका पंथातील प्रशिक्षार्थी साध्वी सिस्टर अभया हिच्या केरळमध्ये गाजलेल्या खून खटल्याचा निकाल तब्बल २८ वर्षांनी लागला असून त्यात त्याच चर्चचे एक पाद्री (Father) फादर थॉमस कुटूर व एक साध्वी (Nun) सिस्टर सेफी यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) गेल्या  ऑक्टोबरमध्ये दिला होता. त्यानंतर येथील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाचे सत्र न्यायाधीश के. सनल कुमार यांनी रोजच्या रोज सुनावणी करून खटला पूर्ण करून निकाल जाहीर केला. फादर कुटूर व सिस्टर सेफी यांना भादंवि कलम ३०२ (खून) व कलम २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे) या गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्यात आले. दोषी आरोपींना नंतर शिक्षा सुनावण्यात येणार होती. सिस्टर अभयाच्या खुनाला (Sister Abhaya Murder Case) कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता त्यामुळे संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारलेला होता. अभियोग पक्षाने उभे केलेले नऊ साक्षीदार उलटले तरी समोर आलेला पुरावा आरोपींना नि:संयपणे दोषी धरण्यास पुरेसा आहे, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला.

या खटल्यात फादर जोस पुत्रीकय्यिल हेही आरोपी होते. तिन्ही आरोपींनी आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी फादर पुत्रीकय्यिल यांना न्यायालयाने गेल्या वर्षी आरोपमुक्त केले. तो निकाल उच्च न्यायालयानेही कायम केला. फादर कुटूर व सिस्टर सेफी यांनी त्यांना आरोपमुक्त न केले जाण्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत अयशस्वीपणे अपील केले होते.

सिस्टर अभया ही कोट्टायम येथील पायस टेन्थ कॉन्व्हेंटमध्ये धार्मिक शिक्षण घेणारी १८ वर्षांची विद्यार्थिनी होती. २७ मार्च, १९९२ रोजी तिचा मृतदेह कॉन्व्हेंटच्या विहिरीत मिळाला. दोन्ही आरोपी त्याच कॉन्व्हेंटमध्ये अध्यापक होते. त्यांच्यातील घनिष्ट शारीरिक प्रेमसंबंध सिस्टर अभयाने पाहिले म्हणून दोघांनी खून करून तिला विहिरीत फेकली अशी ही केस होती. सुरुवातीस ही केस दडपण्याचा खूप प्रयत्न झाला. पण सिस्टर अभयाचे कुटुंब व स्थानिक ख्रिश्चन संघटनांनी नेट लावला. सुरुवातीस स्थानिक पोलीस व नंतर राज्य गुप्तचर विभागानेही सिस्टर अभयाने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून ‘केस’ बंद केली. नंतर तपास ‘सीबीआय’कडे देण्यात आला. त्यांनीही सुरुवातीस दोन तपासी अहवाल देऊन हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे म्हटले. तिसºया अहवालात ‘सीबीआय’ने खून असू शकतो पण कोणी केला हे समजत नाही, असे म्हटले. परंतु मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी हे तिन्ही अहवाल पेटाळून अधिक तपास करण्याचे आदेश दिले होते. शेवटी ख्रिश्चन कार्यकर्त्यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा तपास ‘सीबीआय’च्या कोचिन युनिटकडे सोपविला व त्यांच्या तपासातून हा खटला उभा राहिला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER