ख्रिस गेलने जगातील तब्बल 24 संघासाठी लगावले आहेत षटकार

Chris Gayle RCB

खेळाडूंसाठी वयाची चाळीशी म्हणजे निवृत्तीचे वय…कितीतरी खेळाडूंचा खेळ पस्तीशीनंतरच उतरणीला लागल्याचे आपण पाहिले आहे पण युनिव्हर्स बॉस (Universe boss) ख्रिस गेल (Chris Gayle) हा याला अपवाद आहे. 41 वर्षे वयातही तो दणादण्ण षटकार मारतोय आणि तरुणांना लाजवेल अशा वेगाने धावा जमवतोय. त्याला बघून वय नावाची काही गोष्ट परिणाम करते असे वाटतच नाही.

युनिव्हर्स बाॕसने किंग्ज इलेव्हनसाठी (Kings XI) शुक्रवारी राजस्थान राॕयल्सविरुध्द (Rajsthan Royals) कार्तिक त्यागीला (Karthik Tyagi) षटकार खेचून तो टप्पा गाठला जो कुणाला गाठता तर आलेलाच नाही पण पुढे भविष्यातही तो गाठता येईल का याबद्दल शंकाच आहे. बाॕसचा टी-20 क्रिकेटमधील हा 1000 वा षटकार होता. आणखी एक आणि एकूण आठवा षटकार मारुन त्याने ही संख्या 1001 वर नेऊन ठेवली. दुसऱ्या स्थानावरील किरेन पोलार्डपेक्षा तो तब्बल 311 षटकारांनी पुढे आहे आणि तिसऱ्या स्थानावरील ब्रेंडन मॕक्क्युलमचे तर त्याच्यापेक्षा निम्म्याहुनही कमी 485 षटकार आहेत.

2006 मध्ये स्टॕनफोर्ड 20-20 कप स्पर्धेत त्याने जमैकासाठी बर्म्युडाविरुध्द पहिला षटकार लगावला होता. त्यानंतर एकही वर्ष आणि टी-20 चा एकही संघ असा नाही की त्याने त्यांच्यासाठी षटकार लगावलेला नाही.

टी-20 चा फ्रीलान्सर म्हणून तो जगभर खेळलाय. जगातील प्रत्येक टी-20 लीग त्याने गाजवली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब हा त्याचा 26 वा संघ आहे आणि त्यांच्यासाठी त्याने मारलेल्या षटकारांची संख्या आता 84 झाली आहे.

या 26 संघांपैकी 24 संघांसाठी त्याने किमान एकतरी षटकार लगावला आहे मात्र पीसीए मास्टर्स इलेव्हनसाठी दोन आणि वेस्ट इंडियन संघासाठीच्या एका सामन्यात तो षटकार लगावू शकलेला नव्हता. हे तीनच सामने त्याच्या कारकिर्दीला अपवाद आहेत.

किंग्ज इलेव्हन आधीचा त्याचा संघ राॕयल चॕलेंजर्स बंगलोरसाठी त्याने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. 91 सामन्यांत तब्बल 263 षटकार. त्याचा सुरुवातीचा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्ससाठी 16 सामन्यात 26 षटकार आहेत.

कॕरेबियन प्रिमीयर लीगमध्ये जमैका तलावाजसाठी 53 सामन्यात 124 आणि वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय टी-20च्या 58 सामन्यांमध्ये 105 षटकार त्याच्या नावावर आहेत. बिग बॕश लीग व बांगलादेश प्रिमियर लीगमध्येसुध्दा त्याने षटकारांची बरसात केली आहे.

गेलचे प्रत्येक संघासाठी षटकार (सामने व षटकार या क्रमाने)

राॕयल चॕलेंजर्स बंगलोर – 91 – 263
जमैका तलवाज – 53 -124
वेस्ट इंडिज – 58 – 105
किंग्ज इलेव्हन पंजाब – 30 – 84
रंगपूर रायडर्स – 23 – 60
साॕमरसेट – 8 – 42
सेंट किटस् पेट्रियटस् – 23 – 38
सिडनी थंडर – 14 – 31
बल्ख लिजेंडस् – 7- 27
बरिसाल बर्नर्स – 5 – 26
जमैका – 10 – 26
कोलकाता नाईट रायडर्स – 16 – 26
मेलबोर्न रेनेगेडस् – 8 – 20
माताबेलेलँड टस्कर्स – 6 – 19
वेस्टर्न आॕस्ट्रेलिया – 7 – 17
कराची किंग्ज – 9 – 14
बरिसाल बुल्स – 4 – 12
चित्तोग्राम चॕलेंजर्स – 4 – 12
ढाका ग्लॕडियेटर्स – 1 – 12
लायन्स एसए – 8 – 12
चित्तगाव व्हायकींग्ज – 5 – 10
जोझी स्टार्स – 10 – 8
लाहोर क्वालँडर्स – 5 – 8
स्टॕनफोर्ड सुपरस्टार्स – 2 – 5

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER