छत्रपतींचा महाराष्ट्र कृतीतही दिसू द्या; चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

रायगड : पेणमधील बालिकेवर झालेला बलात्कार आणि हत्या ही अतिशय वेदनादायी घटना आहे. राज्यात आज ६० वर्षीय आजीपासून अडीच वर्षांच्या चिमुरडीपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असे आव्हान भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. (Chitra Wagh challenges CM Uddhav Thackeray over increasing Rape cases) याबाबत ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे सत्र हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पेणमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर, जिने अद्याप आयुष्यही पाहिले नाही, जिच्या हसण्या-बागडण्याचे दिवस आहेत, तिच्यावर निर्घृण बलात्कार करून हत्या करण्यात आली. आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोरोना काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, की त्यांनी न्यायालयाला विनंती करावी, की महिलासंबंधी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना कोरोना काळात जामीन किंवा पॅरोलवर सोडण्यात येऊ नये.’

महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती

‘आमच्या मागणीचा विचार न झाल्यामुळे संबंधित आरोपीने जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा असे दुष्कृत्य केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लातूरमध्ये साठ वर्षीय महिलाही बलात्कारासारख्या गलिच्छ प्रकारातून सुटली नाही. म्हणजे साठ वर्षांची वयोवृद्ध आजी असू देत किंवा अडीच-तीन वर्षांची चिमुरडी, बलात्काराला बळी गेल्या. आज राज्यात महिला सुरक्षा किंवा सक्षमीकरण हे फक्त घोषणेपुरते उरले आहे. मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या.’ असे आव्हान चित्रा वाघ यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER