चित्रा वाघ तुम्ही पवारांच्या तालमीत तयार झाल्या आहात, दिशाभूल करू नका – राष्ट्रवादी

Chitra Wagh - Amol Mitkari

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात पुढाकार घेणाऱ्या भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) राहिलेल्या चित्रा वाघ पतीवर गुन्हा दाखल होताच अधिक आक्रमक झाल्या आहेत. आज पत्रकार परिषदेत वाघ यांनी अधिकच आक्रमकपणे राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले. वाघ यांच्या टीकेला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. “किशोर वाघ (Kishor Wagh) सरांवर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपने २०१६ ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये.” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला. पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांचा आरोप फेटाळला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. किशोर वाघ यांच्यावर यापूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा सन २०१६ रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केला.

तसेच चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. ही बाजू मांडताना त्यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वाघ यांनी यापूर्वी अनेक वेळा बोलून दाखवलं आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते.

याच मुद्द्यावरून आज अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. “तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका.” अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER