मीही पवारांच्या तालमीतील, ते राठोडांना पाठीशी घालणार नाहीत, हा विश्वास – चित्रा वाघ

पुणे :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. आज त्यांनी पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटणार नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं ठामपणे सांगत असतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता त्यांना कृतीतून दाखवावं लागेल. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत. तुमची छबी आहे ती तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही. तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा सवाल उपस्थित करत संजय राठोड हे राज्यभरात फिरतात. मात्र, पोलिसांना ते दिसत नाहीत. संजय राठोड हे पाच-साडेपाच फुटांचे असतीलच. ते पोलिसांना न दिसायला काय मिस्टर इंडिया आहेत का, असा दुसरा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील, ते राठोडांना मंत्रिमंडळातून हाकलून देतील – चित्रा वाघ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER