‘चितळे’ समूहाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटीची मदत

chitale-industry-group-CM Relief Fund

सांगली : कोवीड-19 च्या संसर्गामुळे देशात आणि जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र या उपाययोजना राबवताना आर्थिक मदतीची गरज असल्याने कुठल्याही आपत्तीत मदतीसाठी पुढे येणाऱ्या चितळे उद्योग समूहाने संकटात सापडलेल्या समाजासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या उद्योग समूहातील ‘बी. जी. चितळे’ यांच्याकडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एक कोटी तर पुण्यातील ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याकडून पंतप्रधान मदतनिधीसाठी पन्नास लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले आहे.

हे दोन्ही मदतीचे धनादेश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले. या वेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीश चितळे, निखिल चितळे हे उपस्थित होते.

सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हा निधी दिला असल्याची माहिती श्रीपाद चितळे यांनी दिली. . चितळे उद्योग समूह अत्यावश्यक सेवेशी संलग्नित असल्याने सामाजिक बांधीलकीतून आम्ही तो त्याच कार्यक्षमतेने सुरू ठेवला आहे. हे करताना आम्ही करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घेत आहोत. दूध संकलन करताना सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टस्टिंगचा वापर केला जात आहे. या दूध पुरवठय़ाच्या सेवेसाठी प्रशासनाकडूनही आम्हाला संपूर्ण सहकार्य होत असल्याची माहिती चितळे यांनी दिली.