`चिरंजीव’ संतोष हा कोरोनातला प्रकाश…

Shailendra Paranjapeकोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा अवतार इंग्लंडमधे आलाय, अशी बातमी आली आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीय. अर्थात, ही रात्रीची संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत आहे आणि ती नाताळचा सण तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन लागू केलेली आहे. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करणे योग्य होणार नाही.

कोरोनाच्या वैश्विक संकटामधे गेले आठ महिने कोरोना कोरोना आणि कोरोनाविषयक बातम्या वाचनात, चर्चेत येत आहेत. संकट हे संधीही घेऊन येत असतं आणि त्यामुळेच अशा संकटकाळातही माणुसकीचं अनोखं दर्शन घडवणारे उपक्रमही अनेक व्यक्ती, संस्थांनी राबवले. संकटे कितीही मोठी असली तरी माणुसकी त्याहून मोठी असते आणि माणसाची विजिगिषु वृत्ती कोणत्याही संकटावर मात करते, हे वेळोवेळी अशा उपक्रमांमधून सिद्ध झालंय.

कोरोनाचंही तसंच होईल. त्यावर लसविकसन जगभर सुरू आहे. लशी येतील, कोरोनाही जाईल पण शाश्वतपणे टिकणारी माणुसकी शाश्वत का आहे, हे दाखवून देणारी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. माणुसकी जपण्यासाठी तुम्ही फार मोठे संपन्न श्रीमंत असण्याची गरज नसते हे सिद्ध करणारी एक घटना नुकतीच घडलीय. ही घटना आहे जुन्नरमधल्या एका मजुराच्या चिरंजीवित्वाची.

संतोष धोंडिभाऊ बांगर हा ४३ वर्षांचा मजूरकाम करणारा माणूस. जुन्नरमधल्या बेल्हे गावात राहणारा. पितृछत्र हरपलेलं असल्यानं घरी वृद्ध आई, पत्नी, एक सातवीत शिकणारा मुलगा आणि भाऊ अशा कुटुंबीयांसह हा कुटुंबाची तुटपुंज्या उत्पन्नात गुजराण करत होता. बांधकाम व्यावसायिकाच्याकडे काम करणारा हा मजूर बांधकामाच्या वेळी छोटासा अपघात होऊन बेशुद्ध झाला आणि मेंदूला मार लागल्यानंतर उपचारादरम्यान मरण पावला. घरात कमावणारा कर्ता माणूस या कुटुंबाने गमावला आणि या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळलं.

अशा स्थितीत हिम्मत न हरता बांगर कुटुंबीयांनी संतोष बांगर यांचे डोळे, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस आणि हृदय हे अवयव दान केलेत. संतोषच्या या अवयवदानामुळे चार जणांचे प्राण वाचू शकलेत आणि संतोष बांगर लौकिकार्थाने औपचारिक शिक्षण न घेताही इतरांसाठी संजीवक ठरलेत. कोरोना काळात आपल्या सर्वांनाच जीवनातली क्षणभंगुरता लक्षात आलीय. आपण सारेच एक दिवस जाणार आहोत आणि मृत्यू हीच मानवी जीवनातली शाश्वत गोष्ट आहे, याचे ज्ञान असले तरी भान मात्र बहुतेकांना नसते. हे भान ठेवत बांगर कुटुंबीयांनी मात्र संतोष बांगर यांना चिरंजीव केलंय.

अंधारात सगळेच चाचपडत असताना एक छोटीशी पणती लावणारे, ती लावण्याचा प्रयत्न करणारेच खरे दिशा दाखवतात. मानवी जीवनाला संपन्न करण्याचा रस्ता दाखवतात. तेच काम संतोषनं आणि त्याला त्याच्या मृत्यूनंतरही साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी केलंय. आता समाजानं पुढे यायला हवं आणि या कुटुंबाला पुढं होऊन मदत करायला हवी. कोरोना येईल जाईल उद्या कोरोनासारखे दुसरेही रोग येतील पण अशा सर्व अंधारयुगांमधे प्रकाश दाखवणारे संतोषसारखे चिरंजीवही मानवी जीवनातले सकारात्मकतेचे दिवे उजळवत ठेवतील.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER