लोकजनशक्तीचा ‘चिराग’ बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढणार ; भाजपाचा फायदा होण्याची शक्यता

पाटणा : बिहारमध्ये (Bihar Assembly elections) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा लोकजनशक्ती पार्टीने केली. बिहारच्या विकासासाठी वैचारिक पातळीवर जनता दल युनायटेड सोबत मतभेद आहेत. याच कारणामुळे बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे एलजेपीने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे एलजेपीने स्पष्ट केले.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. जदयू आणि भाजप 119 -119 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत. इतर 5 जागा जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भाजप आणि जदयूच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लोजपला यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. एनडीएच्या जागावाटपात भाजपने सातत्याने आपल्या जागेंच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला फायदा होऊन जनता दला इतक्याच जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष भाजपपेक्षा जवळपास 15 ते 20 जागा अधिक लढण्याची मागणी करत होता. मात्र, भाजप जागांच्या समान वाटपावर अडून राहिल्याने हा जागावाटपाचा निर्णय बराच लांबला. अखेर मॅरेथॉन मीटिंगनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव दिल्लीसाठी रवाना झाले.

भाजपच्यावतीने बिहार निवडणुकीतील जागा वाटपात देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व केलं. जनता दलाकडून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि विजेंद्र यादव यांनी नेतृत्त्व केलं. या चर्चेत लोजपला बाजूला ठेवण्यात आलं. लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे जनता दलाने लोजपच्या एनडीएतील समावेशाला मान्यता दिली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि जनता दलात 50-50 चाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. बिहारमधील एकूण 40 लोकसभा जागांपैकी भाजप आणि जनता दलाने 17-17 जागा लढवल्या होत्या. तसेच 6 जागा लोजपसाठी सोडण्यात आल्या.

दरम्यान बिहारमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या फेरीतील मतदान 28 ऑक्टोबर, दूसरे 3 नोव्हेंबर आणि तिसरे 7 नोव्हेंबरला होणार आहे. निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे.

भाजपसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणे पसंत करू – एलजेपी

निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवारांविरोधात एलजेपीचे उमेदवार उभे असतील. मात्र भाजपविरोधात निवडणूक लढणार नाही. निवडणुकीनंतर भाजपसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणे पसंत करू, असे एलजेपीने जाहीर केले. केंद्रात राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी अर्थात रालोआची सत्ता आहे. रालोआमधून बाहेर पडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढेही काम करू; असे एलजेपीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. एलजेपीच्या निर्णयाचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER