चिपी विमानतळाची वाहतूक सेवा लवकरच होणार सुरू!

Airport transport service

सिंधुदुर्ग :- चिपी विमानतळाचे अनेक उद्घाटन करूनही, त्याच्या सेवेस अद्याप मुहूर्त सापडला नाही. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली. या समितीमध्ये खासदार गिरीश बापट, डीजीसीआयचे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे.

प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश
चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. या पार्श्वभूमीवर हे विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते. विमानतळाच्या कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्ती बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला परवानगी दिली नव्हती.

विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग
मात्र आता विमानसेवा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे, आज जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळाची पाहणी केली. तसेच आयआरबीच्या अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा झाली. ही समिती भारत सरकारला अहवाल सादर करेल.

भाजपा खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ १४ टक्के झाले. मात्र आम्ही ते काम १०० टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरू करणार, अशी माहिती विनायक राऊतांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली.

विमानतळ सुरू होण्यास आणखी वेळ जाईल : उदय सामंत
“चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. चिपी विमानतळ सुरू करण्यात केंद्र सरकारने कोणतीही बाधा आणली नाही. मात्र २३ जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही.” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. “चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असले पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल.” अशी माहिती उदय सामंत यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER