चिपळूण नगर परिषदेत भकास आघाडी कार्यरत – नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांचा आरोप

सुरेखा खेराडे

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत सुचवलेल्या प्रत्येक कामाला शिवसेना स्थगिती देत सुटली आहे. पूर्ण झालेल्या कामांना स्थगिती दिली जाते ही चिपळूणची शोकांतिका आहे. विरोधकांच्या या भूमिकेमुळे चिपळूण नगर परिषदेत विकास आघाडी नसून, भकास आघाडी असल्याचा आरोप चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

रिफायनरी समर्थक मेळाव्याचे उत्तर मेळाव्यानेच देणार; समर्थकांची जोरदार तयारी

चिपळूण शहरात उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या कामाची माहिती देण्यासाठी सुरेखा खेराडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्या म्हणाल्या की, चिपळुणात सांस्कृतिक केंद्राचा विषय खूपच गाजत आहे. हे सांस्कृतिक केंद्र चिपळूणचा मानबिंदू ठरणार आहे. सांस्कृतिक केंद्राच्या कामासाठी शिवसेनेनेही सर्व विषयांना मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षात सांस्कृतिक केंद्राच्या कोणत्याही कामाला शिवसेनेने विरोध केलेला नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे.

असे असताना आता मात्र शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्राच्या कामात त्रुटी काढत आहे, विरोध करत आहे. यामागे त्यांचा नक्कीच हेतू वेगळा आहे, असेही त्या म्हणाल्या. सांस्कृतिक केंद्र सुरू होत नाही म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अभ्यास न करताच माहिती दिली गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पालकमंत्री अनिल परब यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने उद्घाटनाला चालना मिळाल्याचे त्या म्हणाल्या.