चिन्मयने सांगितले त्याचे सख्खे शेजारी कोण होते?

Chinmay Udgirkar

असं म्हणतात की, नातेवाईक सुद्धा प्रसंगी उपयोगी पडू शकत नाहीत. अडीअडचणीला धावून येऊ शकत नाहीत, तिथे आपले शेजारीच आपल्या उपयोगी पडत असतात. सख्खा शेजारचे मिळणं हे खरच आजकालच्या आयुष्यात महत्त्वाचं झालं आहे. खरतर याच शेजारधर्माने अनेकांना कुटुंबाप्रमाणे साथ दिल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशाच एकमेकांच्या सख्ख्या शेजारधर्माची गोष्ट उलगडणारा सख्खे शेजारी हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. दोन शेजाऱ्यांना बोलतं करण्याचं काम अभिनेता चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) दिलखुलासपणे करत आहे. पण याच निमित्ताने चिन्मयचे सख्खे शेजारी कोण होते हे जाणून घेण्याची उत्सुकता सहाजिकच त्याच्या चाहत्यांना होती. जेव्हा अनेक चाहत्यांकडून चिन्मयपर्यंत हा प्रश्न पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या नाशिकमधल्या शेजारी ढेकणे काका काकूंची आठवण सांगणारा व्हिडिओ शूट केला आहे.

लहानपणीचे दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप आठवणींचा खजिना असतो. अशी एकही व्यक्ती नसेल जिने लहानपणी त्यांच्या शेजार्‍यांच्या खोड्या काढल्या नसतील. काहीही करून आपल्या शेजार्‍यांच्या खोड्या काढायच्या आणि मग ते कसे रागवतात, आपल्या आई-वडिलांकडे आपली तक्रार कसे घेऊन जातात हे अनुभवणं एक वेगळी मजा असायची. ही सगळी मजा अभिनेता चिन्मय उदगीरकर याने घेतली आहे.

चिन्मय हा मूळचा नाशिकचा असल्यामुळे त्याचे सगळे बालपण नाशिकमध्येच गेलं. तो सांगतो, नाशिकमध्ये 24 कुटुंब असलेली आमची सोसायटी होती. अर्थातच प्रत्येकजण एकमेकांशी इतका छान जोडला होता की कुणाच्या घरात काय भाजी केली असेल किंवा कुणाच्या घरात काही नवीन पदार्थ केला असेल की तो आम्ही एकमेकांना द्यायचं हा नियमच होता. सोसायटीतील आम्ही मुलं-मुली एकत्र सोसायटीच्या समोरची जी रिकामी जागा होती तिथे खेळायचो. मी ज्या मजल्यावर राहायचो त्या मजल्याच्या बरोबर खालच्या मजल्यावर ढेकणे काका काकू राहायचे. ते दोघेही डॉक्टर होते. मी त्यांच्या इतक्या खोड्या काढायचो की काय विचारूच नका. माझ्या मजल्यावरून मी पाणी टाकायचो ते त्यांच्या गॅलरीत पडायचं. खेळताना मुद्दाम त्यांच्या गच्चीत बॉल फेकायचो. येताजाता त्यांच्या दाराची कडी वाजवून पळून जायचो. बरं गंमत म्हणजे त्यांना हे माहित होतं की हे सगळं मीच करतोय. मला नेहमी असं वाटायचं की आपल्या खोड्यामुळे ते एक दिवस कंटाळतील येतील आणि आपल्याला रागवतील पण त्यांनी मला एकदाही रागवलं नाही.

उलट ते माझ्या आई-बाबांना म्हणायचे की चिन्मय लहान वयात खोड्या नाही काढणार तर कधी काढणार? मोठा झाल्यानंतर थोडच असं करणार आहे? त्यामुळे त्याला आनंद मिळतोय ना तर करू दे. काकूंनी माझ्या लहानपणीच्या खोड्यांना प्रोत्साहन दिलं. माझं बालपण जपण्यात , लहानपणाचा जोआनंद असतो तो मला मनसोक्त घेता यावा म्हणून ढेकणे काका काकू हे माझे सख्खे शेजारी मला वेगळ्या अर्थाने प्रोत्साहन देत राहिले. मी मोठा झालो,मला कळायला लागलं तेव्हा मला चुकीची जाणीव देखील झाली. मी त्यांना माझ्या नकळत्या वयात किती त्रास दिला आणि त्यांनी मात्र माझ्यावर कायम प्रेम केलं . आता मी कामाच्या निमित्ताने मुंबईत राहतो पण अजूनही मी ढेकणे काका काकूंना विसरलेलो नाही. जेव्हा मला सख्खे शेजारी या शोची ऑफर आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला माझे लहानपणीचे शेजारी असलेले ढेकणे काका काकूच आठवले.

चिन्मय याने नाशिकमधूनच एकांकिका प्रायोगिक नाटकं मधून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली . त्यानंतर छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी चिन्मय मुंबईला आला आणि त्याला मालिकांमध्ये संधी मिळत गेली .नांदा सौख्यभरे ही त्याची मालिका विशेष गाजली होती. तर घाडगे आणि सून या मालिकेतील अक्षयची भूमिका करून चिन्मय त्याच्या चाहत्यांचा लोकप्रिय बनला होता. गुलाबजामुन या सिनेमातील छोट्या भूमिकेतही चिन्मयने अप्रतिम अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. आता दोन सध्या शेजाऱ्यांची गोष्ट, वेगवेगळे अनुभव आणि आठवणीच्या माध्यमातून चिन्मय प्रेक्षकांना उलगडून दाखवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER