वेबसाइट बंदीतही चीनची घुसखोरी !

China

बीजिंग : भारताने लोकप्रिय टिकटॉकसह चीनच्या ५९ अॅप्सवर बंदीचा निर्णय घेतला. चीनने त्याआधीच असे केले आहे. चीनमध्ये भारतीय ई-पेपर आणि न्यूज वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. युझर्स भारतातील बातम्या वाचू शकत नाहीत. अनेकांना फक्त ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ म्हणजेच व्हीपीएनसह वेबसाइट वाचता येत आहेत. त्याचवेळी चीनच्या वेबसाइट आणि वृत्तपत्र भारतात वाचले जाऊ शकतात!

चीनमध्ये भारतीय वाहिन्याही आयपी टीव्हीसोबतच उपलब्ध आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएनही बंद आहे. व्हीपीएन हे युझर्ससाठी उपयुक्त आहे. यातून ऑनलाइन प्रायव्हसी ठेवण्यासोबतच स्वतःचं नेटवर्क तयार करता येते. व्हीपीएनमुळे आयपी अड्रेस गुप्त राहतो आणि युझरची माहिती ‘ट्रेस’ करता येत नाही. पण चीनने व्हीपीएन वापरणाऱ्या युझर्सना ब्लॉक करणारे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.

गलवान खोऱ्यातील भारत – चीनच्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. भारताने चीनच्या अॅप्सवर बंदी घालण्यापूर्वीच चीनने भारतीय वेबसाइट आणि वृत्तपत्रांच्या ऑनलाइन वाचण्यावर बंदी घातली होती. केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, युजी ब्राऊजर यासह अनेक लोकप्रिय अॅपवर बंदी घातली आहे. भारतीयांच्या डेटा सुरक्षेचे कारण दिले आहे.

सर्वात जास्त ऑनलाइन सेन्सरशिप असणाऱ्या देशांमध्ये चीन अग्रक्रमावर आहे. देशांतर्गत इंटरनेटवर चीनची करडी नजर असते आणि नियम चीन सरकारच्या मनाप्रमाणेच बनवलेले असतात. कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात जाणारी प्रत्येक वेबसाइट चीनमध्ये बंद करण्यात येते. चीनच्या सेन्सरशिपला ‘ग्रेट फायरवॉल’ म्हणतात. चीन सरकार आयपी अड्रेस ब्लॉकिंग, डीएनएस अटॅक आणि विशिष्ट यूआरएल फिल्टर आणि एससीएमपीनुसार यूआरएलमधील कीवर्ड फिल्टर अशा साधनांचा सेन्सरशिपसाठी वापर करते.

‘साऊथ चायना सी’च्या नोव्हेंबरमधील एका वृत्तानुसार, चीनमध्ये एकूण १० हजार पेक्षाही जास्त वेबसाइटवर बंद आहे. या ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांसारख्या दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्स सारखे वृत्तपत्र, ड्रॉपबॉक्स आणि गुगल ड्राईव्ह (आणि गुगलवरील इतर सर्व) प्लॅटफॉर्मही चीनमध्ये बंद आहेत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, २०१६ मध्ये फ्रीडम हाऊसने चीनला सर्वात खालचा क्रमांक दिला होता. सलग दुसऱ्या वर्षी ६५ देशांच्या यादीत चीनचा क्रमांक तळाला होता. या ६५ देशांमध्ये जगातील ८८ टक्के इंटरनेट युझर्स येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER