चीनचा फिंगर फोरवरुन मागे हटण्यास नकार

- लड्डाखमध्ये स्थिती चिघळण्याची लक्षणे

लड्डाख : पूर्व लड्डाखमध्ये चीनने (China) फिंगर फोरवरुन (eFinger Four) मागे हटण्यास नकार दिला. यानंतर नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनमध्ये लष्करी तणाव वाढू शकतो. सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

पूर्व लड्डाखमध्ये (Ladakh) एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आले होते. तीन ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे गेले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे. तर भारताने या सीमेवर एप्रिलच्या मध्यातील स्थिती कायम करण्याची मागणी केली आहे.

चीनच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते असे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आक्रमकता दाखवल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व लड्डाखच्या सीमेवर रणगाड्यांची संख्या वाढवली आहे. भारतीय सैन्य हायअलर्टवर आहे.

१७ आणि १८ जुलैला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लड्डाख, जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीची माहिती देतील.

कॉर्प्स कमांडरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुमारे १५ तास चर्चा झाली. मंगळवारी सकाळी सुरू झालेली ही बैठक बुधवारी मध्यरात्री पर्यंत चालली. या बैठकीत चीनने फिंगर ४ वरुन मागे हटणार नाही, असे स्पष्ट सांगितले. गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि ग्रोगामधून मागे हटण्याबाबत दोन्ही देशांची सहमती झाली आहे. चीनने फिंगर फोरमधुनही मागे हटावे ही भारताची मागणी आहे. फिंगरचा प्रदेश वादाचा मुद्दा झाला आहे. भारतीय सैन्य आधी फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. आता चीनने फिंगर फोर पर्यंत घुसखोरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER