हम दो, हमारे तीन!; चीनमध्ये कुटुंब नियोजनाचे नवे संतती धोरण लागू होणार

Maharashtra Today

बीजिंग : लोकसंख्येमुळे भविष्याच्या चिंतेत असलेल्या चीनने आता तीन मुलांना जन्म देण्यास (three-child policy ) परवानगी दिली आहे. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या लोकसंख्या येत्या काही वर्षात घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चीनची लोकसंख्या २०१९ च्या तुलनेत ०.५३ टक्क्यांनी वाढून १.४१ अब्ज इतकी झाली. पुढील वर्षापासून या लोकसंख्येत घट होण्याची शक्यता आहे.

चीनने १९७०च्या अखेरीस ‘एकच अपत्य’ धोरण सक्तीने लागू केल्यामुळे देश अन्न व पाण्याच्या तुटवड्यापासून बचावला. साधारणपणे तरुणांची संख्या कमी झाली, की कार्यक्षम वर्ग कमी होतो. वृद्धांची संख्या वाढली, की निवृत्तिवेतनासारखा देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा भार वाढतो. मात्र, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही चीनमध्ये अजूनही मध्यम उत्पन्न गट मोठा आहे. कामगार वर्ग आणि शेतकरी यांच्यावर चीनची सर्वाधिक अर्थव्यवस्था आजही अवलंबून असल्यामुळे चीनप्रमाणेच भारतासारख्या विकसनशील देशालाही लोकसंख्यावाढीतील उतरणीचा त्रास होऊ शकतो.

राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने (एनबीएस) दिलेल्या माहितीनुसार, नवीन जनगणना आकडेवारीनुसार, चीनसमोरील वृद्ध लोकसंख्येचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे. देशामध्ये ६० वर्षांहून अधिक लोकांची संख्या वाढून २६.४ कोटी इतकी झाली आहे. एनबीएसने म्हटले की, लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान वाढल्याने दीर्घकालीन संतुलित विकासावर दबाव वाढेल. देशात ८९.४ टक्के लोकांचे वय १५ ते ५९ दरम्यान आहे. हे प्रमाण २०१० च्या तुलनेत ६.७९ टक्के कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button