उलटा चोर कोतवाल को डांटे

entire world into corona crisis

कोरोना विषाणूच्या फैलावापायी सारे जग वेठीला धरले गेले असून या संकटाची तीव्रता जगभरात सातत्याने वाढत चालली आहे. कोरोना विषाणूमुळे एकट्या युरोपातच ३० हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून हा रोग लवकर आटोक्यात आला नाही तर ही संख्या लाखाच्या आसपाससुद्धा पोहचेल अशी भीती व्यक्त होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक आकडेवारीचे संकेत त्या भीतीत भर घालीत आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका चीनखालोखाल युरोपला बसला आहे. श्रीमंत राष्ट्रांच्या मालिकेत येणा-या इटाली आणि स्पेनला तर या संकटाने हादरवून टाकले असून जगात होणाऱ्या प्रत्येकी चार मृत्यूंपैकी तीन मृत्यू या देशांमध्ये होत आहेत.संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुखांनी कोरोनाला दुसऱ्या महायुद्धानंतर मानव जातीवर आलेले सर्वांत मोठे संकट म्हटले आहे ते खरे आहे; परंतु याच जागतिक संघटनेची आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काहीशी गाफील राहिली असा आरोप केला जातो. कोरोनाचे संकट एवढे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करील याचा या संघटनेला अंदाजच आला नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या विषाणूची चर्चा यापूर्वीही झाली असताना त्यावर रामबाण उपाय शोधण्याबाबत गांभीर्याने प्रयत्न का झाले नाही, अशी विचारणा विविध आरोग्य संघटनांच्या पातळ्यांवर होत आहे. कोरोना विषाणूची लागण जगभरात झपाट्याने वाढत गेली; परंतु तो जेव्हा प्रथम निदर्शनास आला त्या नोव्हेंबर महिन्यातच त्याविरुद्ध आघाडी असती तर जगातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला कोंडून घेण्याची पाळी आली नसती.

जगभरातील बहुतेक देशांत सध्या ‘लॉकडाऊन’ची स्थिती आहे. गेल्या वर्षअखेरी चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून जगात त्या विषाणूमुळे ४१ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले. याखेरीज साडेआठ लाख जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या उद्रेकामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे ती आर्थिक संकटाला निमंत्रण देणारी असून धोकादर्शक असल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांनी व्यक्त केले आहे. चीनमधील वुहान येथे नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोनाचे रुग्ण दिसून आले आणि तेथून या संकटाने सारे जग पादाक्रांत केले. त्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषाणूचा उल्लेख ‘चायना व्हायरस’ असा केला. चीनमधून तो सर्वत्र पसरला म्हणून कदाचित ट्रम्प तसे बोलले असावे. त्याचा चीनला राग आला आणि चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी थयथयाट केला. त्यांचा संताप योग्य की अयोग्य हा तातडीचा मुद्दा नाही. उलट चीनने कोरोनाबाबत जगाला अनेक महिने अंधारात का ठेवले हा केला जाणारा सवाल संयुक्तिक आहे. कारण वुहानमध्ये कोरोनाची लागण झालेली दिसूनही चीनने दोन महिने त्याबाबत कसलीच हालचाल केली नाही. परिणामी हां हां म्हणता हा विषाणू जगभर पसरला.

आज अमेरिका, इंग्लंडसह संपूर्ण युरोप व भारतासह आशिया खंडातील अनेक देश या विषाणूच्या संसर्गाच्या तडाख्यात सापडले आहेत. आपली चूक कधीही मान्य करण्याचा चीनचा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे. याही वेळी तो प्रकर्षाने दिसून आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आपण हलगर्जीपणा केला असे मान्य केले तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतील या भीतीपोटी म्हणा वा आपला तेजोभंग होईल या शंकेपायी म्हणा चीन ते सत्य मान्य करायला तयारच नाही. एवढेच काय कोरोनाचा विषाणू चीनमधून नव्हे तर अमेरिकेतून उत्पन्न झाल्याचा प्रचार त्याने सुरू केला आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.

आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेश देवळाणकर यांनी त्यांच्या एका लेखातून याकडे लक्ष वेधले असून, विषाणूवर नियंत्रण मिळवले ते हुकूमशाहीमुळे, लोकशाही देशांत ते शक्य नाही, असा दावाही चीनने केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात : वुहानमध्ये ज्या कोरोनाचा जन्म झाला त्या विषाणूचा प्रसार अमेरिकेकडून झाला, असा निर्लज्ज दावा चीनकडून केला जात आहे. परंतु हा दावा धादांत खोटा आहे. कारण चीनमध्येच पहिल्यांदा कोरोनाबाबत वाच्यता झाली, त्या डॉक्टर ली यांनीच वुहानमधूनच हा विषाणू संपूर्ण जगामध्ये पसरल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच चीननेच संपूर्ण जगाला संकटाच्या खाईत लोटले आहे.

जगालाही हे सत्य कळून चुकल्याचे लक्षात येऊ लागताच चीनमधील साम्यवादी पक्षाने मोठा ‘प्रपोगंडा’ सुरू केला आहे. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात प्रचंड वेगाने होत असल्यामुळे चीनला आपण एकटे पडू अशी भीती वाटते आहे. संपूर्ण जग आपल्याविरोधात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, हे ओळखल्यामुळे चीनने आपल्या प्रचार यंत्रणेला सक्रिय केले आहे. या यंत्रणेमध्ये लोकांना वेतन देऊन, पैसे देऊन चीनच्या कथित चांगुलपणाचा प्रचार जगभर केला जात असतो. या प्रचार-बचाव नाट्याचाच एक भाग म्हणजे, वुहानमधून परतलेले डॉक्टर, नर्सेस यांना लोक हिरोचा सन्मान देत आहेत, असा प्रचार चीनकडून केला जात आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत चालली असल्याची आकडेवारी चीन प्रसृत करत आहे असे देवळाणकर यांनी पुढे म्हटले आहे.

चीनच्या या उफराट्या वर्तणुकीची दखल घेऊन जगाने यामधून धडा घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना संकटाच्या संदर्भात जी-७ राष्ट्रांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जी बैठक झाली त्याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या छुप्या भूमिकेवर टीका केली. चीनने कोरोना संसर्गासंदर्भात पारदर्शकता ठेवली नाही असे ते म्हणाले. पॉम्पिओप्रमाणेच इतरही देशांची तीच भावना असणार यात शंका नाही; परंतु चीनने अंकित केलेल्या पाकिस्तानसारख्या राष्ट्रांना उघडपणे ते बोलून दाखविता येत नाही हेच खरे.

चंद्रशेखर जोशी