चीनने लपवली होती २०१३ ला सापडलेल्या कोरोनाशी संबंधित विषाणूची माहिती !

China

जिनेव्हा : कोरोनाच्या विषाणूचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत एका अहवालातील माहितीनुसार चीनमध्ये २०१३ ला कोरोना विषाणूशी घनिष्ठ संबंध असलेला विषाणू सापडला होता; पण चीनने ही माहिती जगापासून लपवली होती, अशी माहिती thetimes.co.uk ने दिली आहे. जगात कोरोनाची साथ पसरण्याबाबत चीनवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

याबाबत प्रकाशित वृत्तातील माहितीनुसार वटवाघूळ आणि उंदरांच्या प्रजातीत चीनमध्ये २०१३ मध्ये कोरोना विषाणूशी जुळलेला ‘स्टेन’ सापडला होता. हा विषाणूचा स्टेन चीनने अनेक वर्षांपासून वुहानच्या विवादित प्रयोगशाळेत ठेवला होता. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार त्यांची एक टीम कोरोना विषाणूच्या उगम स्रोताबाबत पडताळणी आणि चौकशी करण्यासाठी जाणार होती. आज, सात वर्षांपूर्वी सापडलेल्या त्या विषाणूच्या पुराव्यांना महत्त्व आले आहे.

२०१२ मध्ये खोदकाम करत असलेल्या लोकांना ताप, कफ आणि न्युमोनिया यासारख्या आजारांची लागण झाली होती. त्यातील तीन रुग्णांची स्थिती गंभीर होती. अहवालानुसार आजारी असलेल्या चार रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसचे ‘एंटीबॉडीज’ सापडले होते. पण तपासणीआधीच दोघांचा मृत्यू झाला.

चीनच्या बॅटवुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शी झेंगली यांनी फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणूवर एकॅडमिक पेपर्स तयार केले होते. नेचर (Nature) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार वुहानमधील लॅबमध्ये वटवाघळांमधून मिळणारा RaTG13 विषाणू ठेवण्यात आला होता.

तो कोरोनाच्या विषाणूशी ९६.२ टक्के मिळताजुळता आहे. झेंगली यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार RaTG13 हा खोदकामादरम्यान आढळून आलेल्या विषाणूचा नमुना आहे. याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमधून आल्याचा दावा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER