चीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी

mosques

बीजिंग : शिनजियांग प्रातांत गेल्या तीन वर्षात हजारो मशिदी पाडण्यात आल्या. ऑस्ट्रेलियन ‘थिंक टँक’च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. उइगर आणि बहुतांश मुस्लिम भाषिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. मुसलमानांनी त्यांचे पारंपारिक, धार्मिक विधी बंद करावेत, यासाठी दबाव टाकला जात आहे, असे अहवालात म्हटले आहे.

चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होतात. त्यांचा आवाज दडपून टाकण्याची कारस्थाने रचली जात आहेत. मानवी हक्कांची पायामल्ली सुरू आहे, असा आरोप चीनवर नेहमी होत असतो.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शिनजियांग प्रांतात सुमारे १६ हजार मशिदी पाडण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. शेकडो धार्मिक स्थळांच्या उपग्रह फोटोंचे विश्लेषण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. विध्वंसाचे हे काम मागच्या तीनवर्षात खूप जास्त झाले आहे. किमान ८,५०० मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या असे अहवालात म्हटले आहे.

चिनी प्रशासनाने मशिदी पाडल्या असल्या तरी, शिनजियांगमधील इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना मात्र हात लावलेला नाही. मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे तर सार्वजनिक शौचालय बांधले आहे. इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत. अतुश सुंथग या गावामध्ये दोन वर्षांपूर्वी एकूण तीन मशिदी होत्या. त्यापैकी तोकुल आणि अजना मशीद पाडण्यात आली. तोकुल मशिदीच्या जागी सार्वजनिक शौचालय बांधले आहे. जिनपिंग सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत हे काम सुरू आहे, असे ‘रेडिओ फ्री एशिया’ने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER