चव आणणारा पण दाह उत्पन्न करणारा तिखट रस !

Red Chilli

तिखट चमचमीत खाणे हे प्रत्येकालाच आवडते. गोड पदार्थ न आवडणारे बरेच असतात पण तिखट पदार्थ न आवडणारा विरळाच. त्रास होतो म्हणून कदाचित तिखट बंद वा प्रमाण कमी करतील पण तिखट खाण्याची आवड मात्र असतेच. सणावाराच्या गोडधोड जेवणानंतर झणझणीत बेत होऊन जाऊ द्या अशी मागणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण करतात.

तिखट द्रव्यांचा (Red Chilli) रस जिव्हेवर स्पर्श केल्यावर झणणारा, तोंड डोळे नाकात पाणी आणणारा, दाह उत्पन्न करणारा असतो. तिखट पदार्थ आहारात असलेच पाहिजे कारण त्याचेही काही गुण शरीराला उपकारक आहेत. भोजन पचविणारे, रुचि वाढविणारा, कफ कमी करणारा, घाम आणणारा, जंतनाशक आहे.

तिखट द्रव्य म्हणजे फक्त आपल्याला मिरचीच तिखट आहे असे वाटते. पण असे नाही. लाल हिरवी मिरची ही तिखट असतेच पण याशिवाय हिंग, काळे मिरे, पिंपळी, सुंठ, ओवा, वावडींग, विलायची, मूळा, लसूण, शेवगा हे सर्व मसाले, पदार्थ तिखट रसाचे आहेत.

तिखट रसाचे द्रव्य जंत, कृमी नष्ट करणारे आहे. जंतामुळे पोटशूळ होत असेल तर या तिखट द्रव्यांचा आहारात उपयोग फायदेशीर आहे. उदा. ओवा, हिंग, जीरे, वावडींग.

सर्व तिखट द्रव्य कफ कमी करणारे आहे. सुंठ मिरे पिंपळी इ. द्रव्ये कफाचे विकार कमी करतात हे आपण बघतोच. तुमच्या लक्षात येईल बरेचवेळा पित्ताचा त्रास असणाऱ्यांना तिखट कमी करा असे सांगितले जाते म्हणजे फक्त लाल मिरची नव्हे तर हे मसाले तिखट रसाचे असल्यामुळे कमी करणे आवश्यक ठरते.

अति तिखट पदार्थ म्हणजे उपरोक्त मसाल्यांचा भरपूर वापर, तिखट मिरचीचा वापर रोज होत असेल तर त्याचे दुष्परीणाम होतात. तिखट रस हा उष्ण असतो त्यामुळे पित्त वात वाढवणारा आहे. छातीत गळ्यात दाह उत्पन्न करतो. चक्कर येणे भ्रम उत्पन्न करणारा आहे. अति तिखट खाण्याने तहान खूप लागते. शुक्र, बल कमी करणारा आहे. म्हणूनच जेवणात भात पोळी डाळी तूप अशा मधुर रस जास्त असलेल्या पदार्थासह मसाल्यांची तिखटाची फोडणी देऊन केलेली भाजी वा आमटी सर्व रसांचा समतोल राखते. मधुर रस वातपित्त कमी करणारा तर तिखट रस वातपित्त वाढविणारा. म्हणूनच आहार हा सर्व सहा रसांनी युक्त असावा. तिखट मसाल्यांचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक ठरते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, रक्त विकार किंवा मलाव्दारे रक्त निघते अशा व्यक्तींनी तिखट मसाल्यांचा त्याग करणे आवश्यक ठरते.

ऋतुनुसार सुद्धा या तिखट पदार्थाचा वापर विचारपूर्वक करावा. शरद ऋतु व उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता शरीराची उष्णता वाढलेली असते. त्यामुळे मिरची सुंठ मिरे पिंपळी लसूण इ तिखट रसाच्या पदार्थाचा वापर अल्प प्रमाणात करणे आवश्यक आहे. वर्षा हेमंत ऋतुमधे गारवा जास्त असतो कफाचे प्रमाण वाढते त्यामुळे सुंठ तुळस ओवा अशा तिखट द्रव्यांचा उपयोग स्वयंपाकात काढा स्वरूपात करणे पथ्य ठरते.

असा हा तिखट रस आयुर्वेदानुसार (Ayurveda) कटु रस गरजेचा पण प्रमाणात घेणे आवश्यक !

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER