‘लिव्ह-इन रिलेशनशीप’ने जन्मलेले मूलही विवाहित दाम्पत्याचे अपत्य मानायला हवे

Live-in relationship - Kerala High Court
  • मुलाच्या दत्तक प्रक्रियेसंबंधी केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

एर्णाकुलम : ‘ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट’नुसार (Juvenile Justice (Care & Protection) Act) मुलाच्या दत्तक देण्यासाठीच्या पात्रतेचा विचार करताना ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणार्‍या जोडप्याच्या मुलालाही विवाहित दाम्पत्याच्या अपत्याप्रमाणे मानले जायला हवे, असा क्रांतीकारी निकाल केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) दिला आहे.

‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाºया अनिता आणि जॉन या जोडप्याचे मूल बालकल्याण समितीमार्फत दुसर्‍या एका विवाहित दाम्पत्यास रीतसर दत्तक दिले गेले होते. परंतु ती दत्तक प्रक्रिया चुकीची होती त्यामुळे ती रद्द करून आमचे मूल आम्हाला परत करावे, यासाठी अनिता व जॉन यांनी याचिका केली होती. ती मंजूर करताना न्या. ए. मुहम्मद मुश्ताक व न्या. डॉ. कौसर एडप्पागाथ यांच्या खंडपीठाने वरील निकाल दिला. याचिकाकर्त्यांचे मूल दत्तक देताना बालकल्याण समितीने अनुसरलेली प्रक्रिया चुकीची व बेकायदा ठरवून रद्द केली गेली आणि ते मूल अनिता व जॉन यांना परत देण्याचा आदेश दिला गेला. मुळात दत्तक प्रक्रियाच बेकायदेशीरपणे केली गेलेली असल्याने ज्यानी ते मूल दत्तक घेतले आहे ते दाम्पत्य त्या मुलावर कोणताही हक्क सांगू शकत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

न्यायालयाने म्हटले की, स्वत:च्या रक्ताचे मूल जन्माला घालणार्‍या जैविक पालकांचा ( Biological Parents) मुलावरील पालकत्वाचा हक्क नैसर्गिक असतो. या हक्काला कायदेशीर विवाहाची पूर्वअट नसते. प्रचलित  विवाहसंस्थेनुसार होणारा विवाह संबंधित व्यक्तीला लागू होणारा व्यक्तिगत कायदा किंवा ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’सारख्या निधर्मी कायद्यावर अवलंबून असतो. परंतु ‘ज्येवेनाईल जस्टिस’ कायद्याखालच्या प्रकरणात रीतसर विवाह झालेला असण किंवा नसणे याने काही फरक पडत नाही. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या जोडप्याचा रीतसर विवाह झालेला नसला तरी त्यांची उभयतांचे हक्क व जबाबदाºया मान्य केलेल्या असतात. अशा संबंधातून जन्माला येणाºया मुलावर त्या जोडप्यातील दोघांचाही निसर्गत: जैविक पालकत्वाचा अधिकार असतो.

या प्रकरणातील अनिता व जॉन हे निरनिराळ्या धर्मांचे असल्याने त्यांच्या विवाहास दोघांच्याही घरच्यांकडून विरोध होता. त्यामुळे दोघांनीही लग्न न करताच ‘लिव्ह-इन रिलेशनशीप‘मध्ये एकत्र राहण्याचे ठरवले. या सहवासातून त्यांना मूल झाले. मध्यंतरी जॉन नोकरी-व्यवसायानिमित्त परराज्यात गेला. अनिताने बरेच दिवस प्रयत्न करूनही त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे कदाचित जॉनने आपल्याला सोडून दिले असा समज करून घेऊन त्याच उद्विग्न अवस्थेत अनिताने मूल कोणाला तरी दत्तक देण्यासाठी बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले. तिने मुलाचा जो जन्मदाखला दिला होता त्यात जॉनचे नाव वडील म्हणून घातलेले होते. ते मूल आपल्याला जॉनपासूनच झाले आहे, पण आम्ही लग्न न करता ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहतो, असे अनिताने समितीला सांगितले. परंतु समितीने ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’ला कायदेशीर मान्यता नसल्याने अनिताचे मूल हे अविवाहित मातेचे मूल आहे, असे गृहित धरून दत्तक प्रक्रिया केली. त्यासाठी समितीने एकट्या अनिताकडूनच आपण मुलावरील हक्क सोडून देत आहोत व ते मूल स्वत:हून दत्तक देण्यासाठी सुपूर्द करत आहोत, असे हमीपत्र लिहून घेतले.

समितीने अनुसरलेली दत्तक प्रक्रिया व त्या अनुषंगाने मूल दत्तक देण्याची क्रिया खंडपीठाने बेकायदा ठरविली. खंडपीठाने म्हटले की, ‘ ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट’ व त्याखालील नियमावलीत मूल दत्तक देण्यास पात्र आहे की नाही हे ठरविण्याच्या दोन स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिलेल्या आहेत. एक प्रक्रिया अविवाहित मातेच्या मुलासंबंधी आहे. त्यात एकट्या त्या मातेकडून मूल दत्तक देण्यासाठी सूपूर्द करण्याचे हमीपत्र लिहून घेणे पुरेसे आहे. दुसरी प्रक्रिया जोडप्यांच्या मुलांसाठी आहे. त्यात जोडप्यातील दोघांकडूनही हमीपत्र लिहून घ्यावे लागते. दोघांपैकी एकाचा ठावठिकाणा नसेल तर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यानंतरही ठावठिकाणा लागला नाही नाही तर तशी नोंद करून नंतर एकट्याच्या हमीपत्रानेही मूल दत्तक देण्यास पात्र ठरते.

खंडपीठ म्हणते की, प्रस्तुत  प्रकरणात अनिताने आणलेले मूल तिचे आणि जॉनचे आहे हे समितीला पूर्ण माहित होते. पण तरीही ती दोघं ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहात असल्याने समितीने ते मूल अविवाहित मातेचे आहे, असे गृहित धरून त्यानुसार प्रक्रिया केली. अनिता व जॉन यांचे सहजीवन कायदेशीर आहे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार नसतानाही समितीने ते केले. जेव्हा मुलाचे दोन्ही जैविक पालक ज्ञात असतात तेव्हा त्या दोघांमधील संबंध कायदेशीर आहेत की नाहीत हा मुद्दा ‘ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट’नुसार मूल दत्तक देण्याची प्रक्रिया करताना गैरलागू ठरतो. अशा वेळी ‘लव्ह-इन रिलेशनशीप’मधून जन्मलले मूल हेही विवाहित दाम्पत्याचे मूल आहे असेच मानून पुढील कारवाई केली जायला हवी.

(टीप: या बातमीत दिलेली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या जोडप्याची अनिता व जॉन ही नावे त्यांची खरी नावे नाहीत. दोघांचीही ‘प्रायव्हसी’ जपण्यासाठी त्यांची खरी नावे न देता काल्पनिक नावे दिली आहेत.)

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button