बालवयाची सोशल मीडियावरील जत्रा

बालपण म्हटलं की आठवतं भरपूर खेळ, मस्ती, हट्ट, तहान भूक विसरून दिवसभर खेळत रहाणं. पण फ्रेंडस् ! विसरा आता हे सगळं. कारण तसही, परीक्षा, स्पर्धा , गुण , या सगळ्या सगळ्यात मध्ये आत्ताच बालपण केव्हाच हरवून गेलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन अजूनही एक गोष्ट बालव यावर आक्रमण करते आहे. पूर्वी लहान मुले गावच्या जत्रेमध्ये जात, तिथला आनंद उपभोगत असत, अगदी निखळ आनंद ! पण आजकालची जत्रा फारच वेगळी आहे. आणि ती आहे सोशल मीडिया (Social Media) वरची जत्रा. जी बालवयातल्या आपल्या दोस्तांसाठी त्यांच्या आई-वडिलांनी आणि मीडियाने भरवली आहे.

काय म्हणता? काही दिवसांपूर्वी युट्युब वर एका साडेचार, पाच वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ बघितला. ती वाटेल तशी, वाटेल त्या शब्दात आईला बोलत होती. तिचे दात ओठ खात बोलणे, बोटाने ठणकावून सांगणे, कमरेवर हात, एकूणच बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्स्प्रेशनस भयंकर होते. की अंगावर काटा येत होता . आणि आई अतिशय कौतुकाने तो व्हिडिओ अपलोड करत होती. ते बघून प्रत्येकाला , आपलं मुल असते तर दोन लावून दिल्या असत्या असं वाटलं असेल. म्हणून मुद्दामच त्यावरच्या कॉमेंट्स वाचल्या. लोकांनी अतिशय समर्पक आणि योग्य अशा जीव तोडून कॉमेंट्स केल्या होत्या. ते बघून मात्र बरं वाटलं. आई वडिलांना एक नाही तर दोन मुले, त्यात मुला-मुलींच्या कोणत्या गोष्टींचे ते कौतुक करतील हे सांगता येत नाही . मुख्य म्हणजे ते खरंच कौतुकास्पद आहे का ? याचा जराही विचार न करता ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अट्टाहास त्यांचा असतो. तो कशासाठी ? त्यामुळे केवळ तुमचे संस्कार, तुमची मानसिकता आणि तो मुलगा किंवा मुलगी घरातल्याच कोणाचातरी अनुकरण करत असणार हे लोकांना सहज लक्षात येतं.

सध्या आणखीन एका अशाच पाच, साडेपाच, सहा वर्षाच्या मुलीचे डान्सचे व्हिडिओ बघण्यात येतात आहे. ती मुलगी त्यामध्ये वयाला अजिबात न शोभणाऱ्या हालचाली ,डोळे मारणे ,ओठ चावणे, आणि वाट्टेल तसे सादरीकरण ,जसे तिला शिकवले तसे सहीसही करत आहे. विभत्स्य आणि लज्जास्पद वाटते बघून ! परंतु त्या मुलीबद्दल अक्षरशः कीव करावीशी वाटते. ज्यापैकी कशाचाच अर्थ तिला कळत नाहीये, ते ती सगळं सुंदर उचलते आहे, म्हणजे तिची एखादी गोष्ट शिकण्याची ग्रास्पिंग किती चांगली आहे, मग त्याचा असा गैरवापर करण्याचा अधिकार पालकांना कुठे आहे ? त्यासाठी सबस्क्रायबर मिळवणे , हा पैसे मिळविण्याचा उद्योग तर नाही ? यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण मला वाटतं मुलांचं अनाठाई कौतुक करणे , हाच उद्देश या पाठीमागे असावा.

यशाचा मार्ग खडतर तपश्चर्यतूनच जातो. रेडीमेड इन्सस्टंट असं काहीही मिळत नाही. हे का समजत नाहीत ? त्यांना एखादी गोष्ट नाही करता आली, नाही मिळविता आली तर ती स्वप्न मुलांकडून पूर्ण व्हावी ही एक नाममात्र चूक ! पण ही चूक शॉर्टकटने आपण मुलांना करायला का लावतो ?

आज काल युट्युब वर सहा ते बारा वर्ष वयोगटातल्या मुला मुलींचे गायन, वादन ,पेंटिंग, नृत्य आणि इतर ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओ लगेच टाकण्याची घाई बरेच पालक करताना दिसतात. परंतु खरंच ते मुलं ती कलाकृती बऱ्यापैकी चांगलं करते आहे का ? याचा विचारही पालकांच्या मनात येत नाही. आई-वडील सोशल मीडियावर ॲक्टिव असतील तर लाईकस, कॉमेंटस् ही खूप मिळतात. काही मुद्दाम मिळवल्या जातात. आणि त्यामुळे मुलांना वाटतं आपण जे काही करतो आहे ते खूप अप्रतिम आहे, आणि तिथेच त्यांची प्रगती खुंटते. फ्रेंडस् ! आजच्या लाईक्सच्या जमान्यामध्ये, सहसा कोणी ओळखी मधल्या मुलांना आवडलं नाही अशी कमेंट कोणी टाकत नाही. आणि मग मुलांना त्यांच्या चुका, किंवा ते जिथे कमी पडत असतील ते कधीच कळणार नाही. यामध्ये आपल्या मुलाचं नुकसान आहे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. या त्या लहान जीवांची काहीही चूक नसते. त्यांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा शाबासकीची गरज असतेच . मग पालक म्हणतील की हे सगळं, मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणूनच आम्ही करत आहोत. पण मग त्यासाठी युट्युब ची गरज नाही, म्हणजे एकदम वैश्विक प्लॅटफॉर्मची गरज नाही. आज ते फार सहज उपलब्ध आहे. त्याऐवजी आपल्या जवळच्या नातेवाईकांना, लोकांना ,मित्रपरिवारात, निवडक लोकांमध्ये ज्यांना खरंच कौतुक आहे, त्या विषयाची जाण आहे, किंवा ज्यांनी दिलेल्या खऱ्या खऱ्या प्रतिक्रिया या आपण सहजतेने स्वीकारू शकतो अशांना हे व्हिडिओ खरंच पाठवावे. यातूनच त्यांची खरी खरी प्रगती होणार आहे.

आत्ता आपण त्यांना विनाकष्ट फळ कसं मिळतं, त्याची ओळख करून देतो आहे. आणि मग जेव्हा एखाद्या या स्पर्धेमध्ये किंवा परीक्षेमध्ये कष्ट करायची वेळ येते, तेव्हा हे कष्ट घेणे, मेहनत करणे, सराव करणे हे शब्द त्यांच्या परिचयाचेच नसतात. मग ही मुले सगळीकडेच शॉर्टकट शोधायला बघतात आणि आपण मात्र त्यांना रागवतो. मुलांचे पाय जमिनीवर न राहता फक्त उंचीवर ठेवण्याचे काम यातून होते.

फ्रेंड्स !आपण जेव्हा सगळ्या कलाकारांबाबत पाहतो, वाचतो तेव्हा किती तपस्या, साधना त्यांच्या कलेमागे असते. कलेची आराधना करावी लागते. पण आपण ही कलाही “रेडी टु इट” कशी आहे हेच मुलांपर्यंत पोहोचवतो. घरातल्या घरात दिलेले प्रोत्साहन ,आत्या ,काका ,मावशीने दिलेले प्रोत्साहन हे मुलांना मोटिवेट करण्यास पुरेसे असते .परंतु म्हणून ज्या वयात मुलांचा विकास होतो त्या कालावधीत मुलांना अशा रीतीने एक्सपोजर मिळवून दिल्याने काही फारसे साधत नाही, उलट वाईट परिणाम होऊ शकतो.

आज-काल रियालिटी शो जमाना आहे .त्यातील प्रकार यापेक्षा वेगळे नाही. गेली अनेक वर्षे विविध वाहिन्यांवर मुलांच्या गायनाचे, नृत्याचे रिॲलिटी शो दाखवले जातात. यात राज्यभरातील मुलं-मुली सहभागी होतात. कार्यक्रमाची नाव फक्त वेगळी असतात .पण त्यातील स्पर्धा ,नैपुण्य ,श्रेणी, कलेचा दर्जा हा ठरलेला असतो. त्यातून मुलांची जी क्षमता ,त्यांची प्रगल्भता समोर येते हा भाग जरी खरा असला तरी त्यांच्या मनावर हे बिंबवलं जातं की या स्पर्धेत हरला आहे, त्यामुळे मग त्यांचे मानसिक बळ कमी होत नसेल का ? त्यामुळे तो जीवनात यशस्वी झाला नाही असे समजावे का ? किंवा गायन आणि नृत्य हे फक्त स्पर्धेत टिकण्यासाठी असते का ? मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की ह्या सगळ्या कला केवळ लोकांसमोर सादर करण्यासाठीच असतात का? त्यातून स्वतःला मिळणारा आनंद किंवा विश्रांतीचा अनुभव मुलांना आपल्याला द्यायचा असतो. यातून भविष्य आत्ता मुलाच्या जीवनात काही नकारार्थी विचारांनीच रण माजवले तर ? पालकांनी तरी अशा कार्यक्रमांमधून मुलांची फजिती का करून द्यावी ? मुलांच्यामध्ये ,त्यांच्याबरोबर मजा लुटताना, फक्त खेळाची मजा लुटायची हे ना परीक्षकांच्या लक्षात येते ना पालकांच्या ! हार जीत किती सारखे पणे घेता येते , हे शिकवले नाही जात. कारण यात व्यावसायिकता, कलेचा बाजार झालेला असतो. इथे साधनेला नाही तर सादरीकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुलांचे बालपण ,त्यातील जीवनरस शोषून घेण्याचा कुठलाच हक्क आपल्याला नाही . त्यापेक्षा त्यांचे बालपण जपता आले तर ते जास्त महत्त्वाचे आहे .आजच्या परीक्षा ,स्पर्धा आणि मार्कस यांनी ऑलरेडी मुलांचे आयुष्य जखडून टाकलेले आहे आणि आता कोरोना ! छोटे छोटे जीव सुद्धा बाहेर जायचं नाही कारण कोरोना येतो म्हणून विनातक्रार घरात राहू लागले आहे. यासाठी त्यांचं कौतुक करायला हवं. या काळाचा योग्य उपयोग कसा करायचा हे आईबाबांच्या हातात आहे .त्यांचं बालपण न हरवता ! नाहीतर मुले म्हणतीलचं ,” ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी ले लो l भले छीन लो मुझसे मेरी जवानी l मगर मुझको लोटा दो बचपन का सावन ,वो कागज की कश्ती वो बारिश का पानी l

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button