कोरोना काळातील बालपण — ” आणि हे सहजतेने साध्य करू या!”

Childhood In Corona

भावनिक बुद्ध्यांकाच्या जोपासनेला खूप महत्त्व आहे .हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते प्रत्यक्षात आणले जात नाही. मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता साधारण IQ टेस्ट चाचणी ने मोजली जाते, गणित भाषा ,तर्कशास्त्र यासारख्या काही क्षमतांवर ती आधारित असते .सर्वसाधारण बुद्ध्यांक 100 समजल्या जातो. त्यामुळे तो जर असेल तर पालक खूप खुश होऊन जातात .पण हा जन्मजात असतो. मात्र EQ जो असतो तो प्रेमळ संगोपनातून अनेक पटीने वाढवणे शक्य असते. आणि मुलांचे प्रत्येक शैक्षणिक व भावनिक यश हे मुलांच्या बुध्यांक व भावनांक यांच्या एकत्रित क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजेच थोडा कमी बुद्ध्यांक असलेल्या मुलांचे संगोपन प्रेमाने आणि डोळस पणे केले गेले तर त्याचा भावनांक वाढून तो असामान्य यश मिळवू शकतो.

पण पालकांची भावनिक क्षमता वाढलेली नसेल, तर ते मुलांना रागवतात, मारतात ,अवहेलना करतात,धाकात ठेवतात .अशा मुलांचा भावनांक वाढत नाही आणि सतत भितीच्या छायेत वावरल्याने मेंदूतील जोडण्या कार्यरत होत नाहीत. परिणामतः काही मुले हुशार असूनही परीक्षेत भीतीपोटी अपयशी ठरतात.

मानवी मेंदूचे दोन भाग असतात ,डावा आणि उजवा .दोघांचीही कार्यपद्धती भिन्न असते .डावा मेंदू विश्लेषण, क्रमवार कार्यपद्धती, तर्कसंगती, गणितातील आकडेमोड ,याबाबत मदत करणारा असतो. उजवा मेंदू शब्दांपलीकडील जग बघू शकणाऱ्या, सृजनशील, प्रतिभा, कल्पकता ,भावमय वृत्ती यांचा समावेश असणारा असतो. ते परस्परांशी जोडलेले आणि परस्परांच्या सहकार्याने काम करणारे असतात .आपल्या शिक्षण पद्धतीत व तथाकथित शिस्तीच्या चौकटीत आपल्या डावा मेंदू वापरायची सवय लागलेली असते.

उजव्या मेंदूचा वापर करण्यासाठी मुलांना उत्स्फूर्त चित्रकला, स्वप्नरंजन ,संगीत ऐकणे, बागकाम, कल्पनेचे खेळ खेळणे, याबाबत मुद्दाम उत्तेजन द्यावे लागतात. त्यामुळे बरेचदा आपल्या क्षमतेचा केवळ अर्धाच भाग आपण वापरत असतो.

दुसरी गोष्ट, यासाठी लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीतले विविध अनुभव, आणि तेही आनंदानुभव हे महत्त्वाचे ठरतात .त्यामुळे मेंदूमधील अनुभवांचे वहन सहजतेने होते आणि संदेशांची योग्य छाननी मेंदू करू शकते. या मेंदूतील जोडण्या आणि संदेशवहन योग्य असंणं म्हणजे मुलांची भावनिक क्षमता वाढणार, यावरच पुढील आयुष्यात मूल कसं वागेल हे ठरत असतं. म्हणून लहानपणीचा प्रत्येक अनुभव शांतपणे, आनंददायी करून मुलांपर्यंत कसा पोहोचेल ?याला संगोपनात प्राधान्य देऊन हाच सातत्याने प्रयत्न व्हायला हवा.यासाठी स्वतः रुद्रावतार धारण करणे सोडून मुलांची अवहेलना टाळावी लागेल. काहीही शिकवतांना मग अभ्यास असो की कला, तो अनुभव आनंदानुभव हवा. चित्र काढणे, आईबरोबर धान्य निवडणे, भाजी निवडणे, आंब्याचा रस काढणे, पापड लाटणे, गणपतीची सजावट असो इ.

यात अडचण येते कुठे ? तर पालकांना त्यांच्या मनाप्रमाणे ते काम व्हायला हवं असतं. ते तितकच परफेक्ट व्हायला हव असतं, घरात पसारा होऊ द्यायचा नसतो आणि ते पटापट उरकायला हवं असं आईबाबांना होत असतं. या गोष्टींवर मात केली तर हे अनुभव आनंदानुभव करता येतील.

भावना विकास किंवा भावनिक क्षमतेच्या विकासाच्या पायऱ्या कुठल्या?

१) स्वतःच्या भावभावना नीट ओळखणे.
२) भावना नीट ओळखल्यावर त्यांना काबूत ठेवून ,शिस्तशीरपणे ,त्या त्या वेळी, योग्य पद्धतीने व्यक्त करणे.
३) बाह्य पुरस्कारांची गरज न पडता स्वतः स्वतःला प्रेरणा देणे.
४) दुसऱ्यांच्या भावभावना जाणून घेऊन त्यांची कदर करणे.

कालच्या लेखामध्ये आपण रूटीन विषयी बोललो .जर असे रूटीन असेल तरच आपण अतिरिक्त वेळ काढू शकतो .नाहीतर सगळा दिवस कामातच जाणार असतो. वेळ नसल्यामुळे या मुलांच्या ऍक्टिव्हिटी घेताना, आपला पेशन्स राहत नाही .त्यांचा वेंधळेपणा वा परफेक्ट नसणे आपल्याला बोचायला लागते. त्यांना वाढवणे हे फक्त लक्ष्य बनते .पण ही प्रोसेस आपण एंजॉय करू शकत नाही, आणि ती त्यांनाही आनंददायी होऊ देत नाही .पर्यायाने नकळत आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो .त्यांची भावनिक वाढ करण्यात कमी पडतो .

मला सुचलेले काही उपक्रम या काळासाठी सुचवते आहे.

आपण मागील काही लेखांमध्ये बघितल्याप्रमाणे, भावनिक बुद्धिमत्ता विकास ,शारीरिक हालचाली वाढवणे, सेल्फ स्टडी, मीडियावर चा वेळ कमी करणे, योग्य संतुलित आहार ही काही टारगेटस आपल्यासमोर या काळासाठी होती.

* शारीरिक हालचालींसाठी बेडूक उड्या, दोरीवरच्या उड्या ,सूर्यनमस्कार या गोष्टी घरी पण करता येतात. तसेच झुम्बाचे बरेच व्हिडिओज यूट्यूब वर मिळतात. मुलांबरोबर ते करताना सगळ्यांनाच खूप मजा येईल.*स्वतःचा मीडिया वरचा वेळ कमी करून गप्पांवर आणि स्वतःच्या कृतींवर भर द्यायचा आहे. या अनुषंगाने काही प्रोजेक्टस आपण करू शकू

# प्रत्येकाच्या वयानुरूप डायट प्लॅन. त्यानुसार पदार्थ शोधणे. आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र बनवणे. तसेच आहार विषयक माहिती जमविणे ,अन्नघटकांप्रमाणे पदार्थांच्या रेसिपी शोधून चिटकवणे. या प्रोजेक्टचा फायदा असा होईल की त्यांना पॅक फूड खाण्यातले तोटे कळून ते मुळातूनच आहाराविषयी सजग होतील.

# काही औषधी वनस्पती ,त्यांचे उपयोग. हे लक्षात घेऊन बागेमध्ये किंवा टेरेस गार्डन मध्ये ही रोपे लावणे आणि त्यांची वाढ करणे. या उपक्रमामुळे नैसर्गिक औषध ,तीही स्वतःच्या बागेत लावलेली यांचे महत्त्व पटेल. पुन्हा त्यासाठी करावे लागणारे कष्ट म्हणजे शारीरिक हालचाल असे यातून बरेच फायदे मिळतील.

# वेगवेगळे संगीतकार, गीतकार यांची गाणी .त्या संगीतकाराची विशिष्ट स्टाइल असते की त्यांची गाणी त्यामुळे ओळखायला येतात या विषयीचा एखादा प्रोजेक्ट किंवा त्यांचा आवडता कलाकार कुठल्याही क्षेत्रातला, त्याच्या विषयीची सविस्तर माहिती आणि त्या अनुषंगाने येणारे इतर माहिती असाही प्रोजेक्ट करता येईल. यामुळे मुले तानसेन जरी झाली नाही, तरी कानसेन जरूर होतील.

# विविध लोकांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून कुणाकुणाच्या नकला करून दाखवणे ,मिमिक्री करणे, एखादी थीम घेऊन गोष्ट पूर्ण करणे ,एखादी ओळ घेऊन कविता पूर्ण करणे, एखादा विषय घेऊन त्यावर एखादा पाच मिनिटाचा रोल प्ले बनवणे. किंवा वेगवेगळे क्राफ्ट च्या वस्तू मीडियाचा वापर करून बनवणे .(फक्त ते केवळ बघत राहायचे आणि छान म्हणायचं असं नाही तर एखाद दोन वस्तू बघितल्या की त्या पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय पुढच्या बघायचे नाहीत हा नियम सगळ्यांसाठी करून टाकूया.) एखादी नवीन भाषा शिकण्यासाठी हा कालावधी चांगला आहे .

आणखीन एक गोष्ट करण्यासाठी म्हणजे –

ऑनलाईन क्लासेस ला जास्त महत्व देण्यापेक्षा या कालावधीत “सेल्फ स्टडी” ची सवय लावता येईल. नोट्स कशा काढायच्या ?धडा वाचायचा म्हणजे काय? छोटे व मोठे प्रश्न प्रत्येक पॅरेग्राफ वर आपणच कसे काढा? उत्तरे कशी लिहायची ?त्यात मुद्देसूद पणा कसा आणायचा? जो विषय अभ्यासतो आहोत या संबंधी अधिक माहिती, रेफरन्सेस कसे शोधायचे ?त्या गोष्टीचा व्यवहारात उपयोग कुठे होतो किंवा होऊ शकेल? याचा विचार करता येईल.

तसेच दररोज अभ्यासाला बसण्याच्या वेळा ,जागा ,निश्चित करून अभ्यासाची सवयही लावता येईल. लेखन कौशल्य ,वाचन कौशल्य, स्मरणशक्ती ,एकाग्रता विकसित करण्याचा प्रयत्न ही करण्यासाठी हा काळ योग्य आहे.

विविध संस्कृत स्तोत्रे आपल्याकडे आहेत. ती देवाची वगैरे म्हणून म्हणावी हे पटायचे कदाचित मुलांचे वय नाही .त्यासाठी त्यांना आग्रह धरला ते ती धुडकावून लावतात. त्यापेक्षा भाषाशुद्धी, उच्चार स्पष्ट होण्यासाठी त्याचा फायदा होतो. जेणेकरून पुढे चालून कुठल्याही क्षेत्रात उदाहरणार्थ वाचिक अभिनय चांगला होण्यासाठी ,आकाशवाणीत काम करण्यासाठी ,गाण्यासाठी असे उच्चार कसे उपयोगाचे होतात हे सांगता येईल. मुख्य म्हणजे त्या शब्दाचा विशिष्ट असा उच्चार केला तर अर्थ काय होतो ?व उच्चार बदलला तर अर्थ कसा बदलतो ?याची ही मुलांना गंमत वाटू शकेल.

दररोज बरोबर असताना सध्या स्थितीतील देशातील परिस्थिती चीनची चाललेल्या झटापटी अमेरिकेत होणारी नोव्हेंबर मधली निवडणूक ,पावसाने सध्या कुठल्या पिकांचे नुकसान होते आहे ते सुशांत सिंग ची आत्महत्याने उघड होणारे ड्रग्स विषयी इतर सर्व घडामोडी या सगळ्या बाबत सज्जता आणून देण्याचा हा काळ!

या काळामध्ये मुले सध्या जास्तीत जास्त आईवडिलांच्या सहवासात आहे .त्यामुळे आपले मूल कसे आहे, त्याला काय आवडतं ?त्याला काय नाही? आवडत कुठले मनाचे कंगोरे घासायला हवेत? आणि कुठल्या गोष्टी त्याच्याकडून आपण शिकायला हव्यात? हो ! बरोबर वाचले तुम्ही ! मुला निष्पाप आणि स्वच्छ मनाची असतात त्यांच्यात खूप पॉझिटिव्हिटी असते आपल्यावर जे वर्षानुवर्षाच्या अनुभवांचे नकारात्मक बसलेले असतात ते बरेचदा मुलांकडे डोळसपणे बघितलं त्यांच्याशी बोललो तर दूर केल्या जाऊ शकतात.”फक्त मी मोठा/मोठी म्हणून माझा ऐकायचं! चुपचाप शहाणपणा करायचा नाही!”हा दृष्टीकोन मात्र आपल्यामध्ये मुलांमध्ये मोठी भिंत उभी करतो हे निश्चित!

थोडक्यात आता थोडक्यात काय तर हे सगळे उपक्रम अगदी “सहजतेने साध्य करायचे आहेत !” कुठलेही संस्कार करतोय या अविर्भावात नाही !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER