कोरोना काळातले बालपण (भाग तिसरा)

गिरवू या अनुभवाच्या पुस्तकातले पाठ !

Childhood In Corona Time Part 3

कालच्या लेखात बघितल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत मुले घरी आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ती गोष्ट वेगळी ! परंतु इतरही वेळा, नेहमीच्या परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत घोळ कुठे होतो आहे हे बघितलं तर नक्कीच वाटेल की सध्याची वेळ आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी खूप योग्य असा काळ आहे.

आजच्या लेखात सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार आपण करणार आहोत; पण कुठेही रेडिमेड किंवा टेलरमेड दिनचर्या आखून दिलेली नसेल. नाही तर पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकातील दिनू ज्या प्रकारे अभ्यासाचा टाईम टेबल बनवतो तशी आपली स्थिती व्हायची!

म्हणूनच, “चला रे !आजपासून आपण दिनचर्येप्रमाणेच कामे करायची बरं का ?”

वगैरे आपल्याला अपेक्षित नाही. र हे सगळे सहजतेने साध्य करायचे आहे. मुळात आपल्याला काय साधायचं आहे ? काय कमी आहे हे बघायचं. कुठल्या गोष्टीत सुधारणा आवश्यक आहे? कुठल्या गोष्टी करायला हव्यात? यासाठी शिस्त कशी गरजेची ? हे बघितल्यावर आपापल्या घरांनुसार प्रत्येक आई-बाबांनी मिळून आपल्या घरासाठी या गोष्टी कशा अमलात आणायच्या ते ठरवावे लागेल. कारण प्रत्येक घराची भिन्नता आणि भिन्न स्वभाववैशिष्ट्य.

दिनचर्या फक्त एवढ्यसाठी हवी, की आयुष्यात शिस्तीला आणि नियोजनाला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय आयुष्यात काहीच मिळू शकत नाही; पण त्यात टोकाचा काटेकोरपणा नको म्हणजे आवश्यक असेल तर काही ठिकाणी थोडी सूट देता येईल. साधारण जेवणाच्या वेळा, आंघोळी, झोपण्याच्या, उठण्याच्या वेळा ठरलेल्या  हव्यात ! भूक लागल्याशिवाय कसं जेवणार ? हा प्रश्न समोर येणारच . पण उशिरा उठून उगीचच भरपेट नाष्टा केला, मग भूक दुपारी तीन-चार वाजता लागणार आणि मग सगळ्याच गोष्टींचे नियोजन बिघडणार. त्यापेक्षा पोटाला आणि शरीराला ही एक सवय लागते. त्यामुळे योग्य वेळ भूक लागायला लागते, झोपही येते. आज झोपेच्या तक्रारी वाढल्या आहेत; कारण झोप येऊनही आपण उगीचच मीडियाचा वापर करत ती लांबवत राहतो.

वेळेचा फायदा कुठल्या मुद्द्यांसाठी करून घ्यायचा ? एका शब्दात सांगायचं तर ‘अनुभव घेण्यासाठी!’

आज लहान मुलांच्या पुस्तकातल्या गोष्टी, कविता या आपण जेव्हा वाचतो किंवा सांगतो तेव्हा लक्षात येते की, अनेक गोष्टी त्यांनी टीव्हीवर किंवा पुस्तकातच बघितलेल्या असतात. अनेक धड्यांमधील बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा, मोट या तर फार मोठ्या गोष्टी झाल्या; पण गवतफूल किंवा गोगलगाय यासारख्या गोष्टी पण त्यांनी बघितलेल्या नसतात. घरात राहूनही घरातल्या वस्तूंची  नावे त्यांना माहिती होण्याची शक्यता नसते; कारण “तुम्ही तुमचा अभ्यास आणि परीक्षा बघा” असे म्हणून आई कौतुकाने हातामध्ये चहा आणि नाश्ता देत असते.

बरेचदा इंटरनेट किंवा इतर ठिकाणाहून मिळणाऱ्या माहितीही सध्या एवढा विस्फोट आहे की बरीच मुलं एकाच विषयाची खूप जास्त माहिती मिळवत असतात. मग इतर अनुभव मात्र फारच कमी असतात. त्यामुळे या एककल्लीपणाने इतर विषयांमधले शिक्षण बाजूला राहते आणि शाळेमध्ये त्यांचा सहभाग कमी राहतो. इतर विषयांमध्ये इंटरेस्ट राहात नाही म्हणून तक्रारी येतात. प्रत्येक वस्तू स्वतः हाताने हाताळणे , बरोबरीच्यात  बरोबर मिसळून खेळणे होत नाही.

ही बातमी पण वाचा : “कोरोना काळातले बालपण –“(भाग 2)

 

बऱ्याच  पालकांच्या बाबतीतही ही स्थिती होते . ते जिथे जिथे कुठे वर्कशॉप, व्याख्यान, विविध पालकत्वावरची पुस्तके वाचतात. पण त्यांचा वापर प्रत्यक्ष कृतीत करायला मात्र होत नाही. आपण त्याचा किती प्रत्यक्ष वापर करतो याचे मोजमाप केले तर ते फारच कमी दिसते. प्रत्यक्षात मुलाने भावना व्यक्त केल्यावर आपण कसे व्यक्त होतो हे भिन्न असते.

बरेचदा मुलं कार्टून न बघता डिस्कवरी बघतात म्हणून पालकही खूप खूश असतात किंवा आपणही बरेचदा डॉक्युमेंटरी बघितली की आपल्याला खूप भारी वाटतं. परंतु प्रत्यक्ष ते जे जगतात त्यांचा अनुभव आणखीनच भारी असतो… तो प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही.

खरे शिक्षण होते ते या अनुभवातून ! कृतिरूप सहवास म्हणजे अनुभव घेत जगणे!

सध्या परिस्थितीमध्ये एका आईचा अनुभव खूप बोलका होता. ती म्हणाली की, यानिमित्तानं मुलं घरात राहतात आहेत. दररोज वेगवेगळे पदार्थ कर म्हणून आईला सांगितल्यानंतर, आईला किती पूर्वतयारी करावी लागते ? काय काय वस्तू लागतात? काय नियोजन करावं लागतं? किती कष्ट लागतात? हे मुलांना कळलं! त्यामुळे आता मुले पण हा पदार्थ कर असं सांगताना मी तुला काय मदत करू ? असे विचारायला लागली. त्यामुळे त्यांना पैशांचं  महत्त्व कळायला लागलं.

राघव नाटकात काम करायला लागल्यापासून, बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून वावरताना त्याला जो अनुभव मिळाला, सेट लावणे, जड सामान उचलणे, ट्रक भरणे, वस्तूंची जोडाजोड, ठोकून बसवणे या सगळ्यांचा  परिणाम असा झाला की, कुठलीही वस्तू बिघडली तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो ती दुरुस्त करतो. त्यासाठी खाटखुट करून प्रयत्न करतो आणि ती दुरुस्त करतोच.

ही बातमी पण वाचा : कोरोना काळातले बालपण आणि भावविश्व !

हीच गोष्ट आपल्याला पैशाच्या मूल्याबाबतही म्हणता येईल. बऱ्याच घरांमध्ये खूप खूप वस्तू आणून ठेवल्या जातात आणि वस्तू संपण्याचा अनुभव येऊ दिला जात नाही. घरामध्ये अगोदरपासूनच स्केच पेन, रंगकांड्या असं सगळं असताना परत मध्येच मागितले म्हणून वॉटर कलर मागतोय म्हणून आणून दिल्यामुळे, “मागितल्यावर वस्तू मिळते” हेच त्यांच्या लक्षात येतं आणि पैसा ही काय चीज आहे हे त्यांना समजेनासं होतं!

मुलांना भूक लागली हे कळू न देता बऱ्याचशा आया तत्परतेने आल्याबरोबर हातात खायला तयार ठेवतात.  त्यामुळे भुकेचे महत्त्वही कळत नाही. गाडीपाशी येऊन भीक मागणारे, पोट पाठीशी लागलेली लहान मुलं काय भोगत असतील याची कल्पना त्यांना येणारच नाही.

सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली भेळ किंवा आंब्याचा रस किंवा बनवलेला एकत्र पदार्थ स्वतःच्या हाताने बनवल्याने त्याची चवही आवडते आणि त्याची किंमतही कळते.

साधे हातांनी  केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन संहितानं  आपल्याकडे लावलं. यासाठी तिला बरीच तयारी करावी लागली.  आधी सगळ्या मैत्रिणी मिळून वस्तू तयार केल्या. नंतर त्याच्या किमती ठरवल्या. लेबल लावले .लोकांना आमंत्रणं  दिली. प्रदर्शनाची मांडणी केली. काही लोकांना आमंत्रित केलं.  यामुळे त्यांच्या गाठी बराच अनुभव जमा झाला.

सर्वज्ञ आणि त्याची छोटी बहीण बरोबर त्यांच्या छोट्या टेरेसमध्ये दररविवारी गार्डनमध्ये काम करतात. तसेच त्यांनी छोटीशी बाग फुलवली. सगळ्यांनी मिळून घेतलेला अनुभव त्यांना आनंद देणारा आणि शिकवणारा  असा दोन्ही होता. सध्या सगळे घरी आहेत, या दिवसांमध्ये भरपूर सण येतात आहे. अशा वेळी या वर्षी येणाऱ्या सगळ्या सणांची तयारी या वर्षभर जर सगळ्यांनी मिळून केली तर आपोआपच सगळ्यांना त्याविषयी माहिती मिळेल. एकत्र कामाचा आनंद मिळेल आणि आईचाही कामाचा भार हलका होईल.

ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले डेली रुटीन आखताना लक्षात ठेवायच्या आहेत.

“पूर्ण वेळ हातातलं काम सोडून मुलांना सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.” असं पुस्तकी पालकत्व घडवत जायचं नाहीये.

  • मुख्य गोष्ट रुटीनमध्ये सहजता हवीच ! मात्र रुटीन हवे हे नक्की !
  • घड्याळाच्या काट्याच्या तालावर नाचणं हा उद्देश नाही तर एक शिस्त जीवनाला असणे आवश्यक आहे म्हणून रुटीन हवे.
  • प्रत्येक वेळी वेगळ्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजेत असाही अट्टहास नसावा. तर घरातील सर्वांनी एकत्र बसून टाईमपास गप्पा करा. त्यातून नकळत सगळे एकत्र येतील.
  • आपलं घर ,त्या घरातील कामे सगळ्यांनी मिळून करायची आहेत यात बाबांची भूमिका महत्त्वाची . बाबाही करतात म्हटलं की मुले आपोआपच करतात. आणि मुलांना त्यांची त्यांची कामे आपल्या आपल्या हातांनी करू द्या.
  • पण सवय लावायची म्हणून आणि लहान आहे म्हणून उठता बसता काम सांगत राहणे आणि सूचना देत राहणे असं जर घडत असेल तर मात्र मुले कुरकुरतात. त्यांचा वेळ घालवायला त्यांनाही स्वस्थता हवी आहे. ती कुठला तरी पिक्चर बघत असतात, त्यांना दहा वेळा उठवलं तर कुणाला आवडेल? याऐवजी काही कामं सोपवली तर तिथे निश्चित करतात.
  • घरातली कामे आई-बाबा एकत्र मिळून करतात, वाचन करतात, लेखन करतात, गाणी म्हणतात, वाद्य वाजवतात, देवासमोर नतमस्तक होतात, यासारखा वेळ घरात जाताना बघत असतील तर नकळत सगळे संस्कार होतात. पाहुणे आले आहे व त्यांच्याशी आई-बाबा कसे वागतात हे ते बघतात आणि त्याची पावती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते देतातही . प्रत्येकाची पद्धत वेगळी ! पण ते त्यांची पावती आपल्यापर्यंत पोचवतात, “ही तुमची कृती मला खूप आवडते आहे.” आणि जी कृती आवडते ती ते शिकतातच!

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER