इसापूर धरणाचे पाणी माजी मुख्यमंत्र्यांनी पळविले; मुख्यमंत्री फडणवीस यांनी वळविले-खा.चिखलीकर

Chikhalikar

नांदेड/विशेष प्रतिनिधी :- राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आघाडी सरकारच्या काळातच इसापूर धऱणाच्या वरचे 105.13 दलघमी पाणी विदर्भाकडे पळविण्याचे पाप करण्यात आले. त्यामुळे इसापूर धरणातील पाण्याची आवक कमी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, धर्माबाद, उमरी भागातील सिंचन क्षेत्र अडचणीत सापडले होते. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारने कयाधू नदीतून 109 दलघमी पाणी इसापूर धरणात वळविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे भोकर मतदारसंघातील जमीनी वाळवंट होण्यापासून वाचले. माजी मुख्यमंत्र्यांनी पाणी पळविले तर मुख्यमंत्र्यांनी इसापूर धरणात पाणी वळविले असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

ही बातमी पण वाचा:- मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे बारड येथे प्रतिपादन  

पैनगंगा नदीतून इसापूर धरणात 900 दलघमी म्हणजे 30 टीएमसी पाण्याचे आवक असलेले धरण बांधण्यात आले आहे. या धरणावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, धर्माबाद, उमरी या भागातील 80 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होते. शेतकर्‍यांच्या पिकासाठी देण्यात येणार्‍या प्रत्येक पाणी रोटेशनसाठी 35 दलघमी पाणी लागते.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात दि.18.3.2008मध्ये इसापूर धरणात येणार्‍या पैनगंगा नदीतून 900 दलघमी पाण्यापैकी 105.13 दलघमी पाणी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाच्या वरच्या भागावर मोठ-मोठे बॅरेजेस बांधण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे इसापूर धरणातील पाण्याचा तुटवडा भासू लागला. विदर्भाकडे वळविण्यात आलेल्या 105.13 दलघमी पाण्यात नांदेड जिल्ह्यातील तीन रोटेशनच्या पाण्याची तूट भासू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

विदर्भाकडे पाणी वळविण्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या निर्णयाचा फायदा विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्याला झाला. भोकर मतदारसंघासह उमरी, धर्माबाद भागाला वाळवंट करण्याचे पाप अशोक चव्हाण यांनीच केले आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. इसापूर धरणातील पाण्याची आवक कमी झाल्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांत पाण्यासाठी ओरड होताच भाजपा सरकारने पाणी पळविल्याची अफवा पसरवून शेतकर्‍यांत गैरसमज निर्माण करण्याचा गोरखधंदा अशोक चव्हाणांनी सुरु केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोधी निर्णय घेतला होता. आघाडी सरकारने घेतलेला हा चुकीचा निर्णय बदलण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने हालचाली सुरु केल्या. कयाधू नदीवरील नियोजित सापळी धरण आहे. या धरणाची 200 दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. या धरणाला 1968 साली मंजूरी देण्यात आली होती. या धरणात 5 हजार हेक्टर सुपीक जमीन जात असल्यामुळे त्या भागातील शेतकर्‍यांनी सापळी धरणास विरोध केल्यामुळे या धरणाचे काम सुरु होवू शकले नाही. या सापळी धरणावर नांदेड जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर जमीनीचे सिंचन होणार होते. धऱणाचे काम सुरु न झाल्यामुळे त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होवू शकला नाही.

इसापूर धरणात येणारे 105 दलघमी पाणी विदर्भाकडे वळविण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्याला मिळणार्‍या पाण्यात घट झाली. भोकर मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाले. विदर्भाकडे वळविण्यात आलेल्या पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी यावर उपाय म्हणून पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी.आर.देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस सरकारकडे सापळी धरणाचे पुर्ननियोजन व पुनर्विलोकनाबाबतचा प्रस्ताव दि. 18.3.2015 रोजी पाठविण्यात आला. या प्रस्तावास मंजूरी देवून भाजपा सरकारने दि. 13.3.2019 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात कयाधू नदीतून इसापूर धऱणात 109 दलघमी पाणी वळविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्हीच सांगा इसापूरचे पाणी कोणी पळविले आणि कोणी वळविले असा सवाल खा. चिखलीकर यांनी पत्रकारांना केला आहे.