मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे – फडणवीस यांची टीका

हेक्टरी २५ - ५० हजारांच्या नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या ठाकरेंनी दिले १० हजार !

Fadnavis-Cm Thackeray

मुंबई :- पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रपरिषदेत हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर केली. हे पॅकेज फसवे आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

फडणवीस म्हणालेत – राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवला आहे. आज जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे आहे, असे ट्विट केले.

बळिराजाला अतिशय तोकडी मदत देताना कारणे शोधली जात आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.यापूर्वी २५ आणि ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत मागितली होती! आता तेवढी मदत द्यायची नाही म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. परंतु, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना काहीही मदत मिळणार नाही. करणे सांगून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा आणि फसवणूक केली आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शेतीचे झालेले नुकसान पाहता किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांचा मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे, आता सरकारही सूड घेत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER