
- कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाने दणका
बंगळुरू : विशेष न्यायालयाने बंद केलेला एक भ्रष्टाचाराचा खटला पुनरुजीवित करून कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना दणका दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयाने येदियुरप्पा आणि माजी लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कत्ता सुब्रह्मण्य नायडू यांच्याविरुद्धची भ्रष्टाचाराची एक फिर्याद खटला न चालविताच रद्द केली होती. मूळ फिर्यादी ए. आलम पाशा यांनी त्याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून न्या. जॉन मायकेल कुन्हा यांनी त्या फिर्यादीची रीतसर दखल घेऊन (Cognizance) खटला चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयास दिला.
येदियुरप्पा सन २००८ ते २०१२ या काळात मुख्यमंत्री असतानाची ही फिर्याद आहे. बंगळुरू शहरातील २० एकर क्षेत्रफळाची एक खासगी जमीन भूसंपादनातून वगळून त्या खासगी जमीन मालकाला गैरवाजवी लाभ देत सरकारचा ८.६४ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप त्यात होता. पाशा यांनी ती फिर्याद दाखल केल्यावर विशेष न्यायालयाने चौकशीसाठी ती लोकायुक्त पोलिसांकडे पाठविली होती. पोलिसांनी इतर नऊ आरोपींविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हणत येदियुरप्पा व नायडू यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. परंतु मूळ फिर्यादीत या दोघांचे नाव किंवा त्यांच्याविरुद्ध कोणताही आरोप नसल्याने या ओरापपत्राच्या आधारे त्यांच्यावर खटला चालविता येणार नाही, असे म्हणून विशेष न्यायालयाने खटला न चालविता फिर्यादच रद्द करून टाकली होती.
असे करणे चुकीचे ठरवत उच्च न्यायालयाने म्हटले की, स्वत:च तपासासाठी पाठविलेल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यानुसार खटला चालविण्याखेरीज विशेष न्यायालयापुढे अन्य कोणताही पर्याय असू शकत नाही. विषेष म्हणजे येदियुरप्पा आता पुन्हा मुख्यमंत्री असूनही विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर बी. एस. प्रसाद यांनीही फिर्यादीची बाजू घेऊन खटला पुनरुज्जीवित करण्याचे समर्थन केले.
खासगी जमिनी भूसंपादनातून वगळण्यासंबंधी येदियुरप्पा यांच्याविरुद्द आणखीही दोन गुन्हे नोेंदले गेले होते. ते रद्द करण्यासाठी येदियुरप्पा यांनी केलेल्या याचिकाही न्या. कुन्हा यांनीच काही महिन्यांपूर्वी फेटाळल्या होत्या. ते प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येदियुरप्पा यांच्या संभाव्य अटकेला स्थगिती दिली गेली आहे.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला