भूमिहिनांना एक लाख एकर जमीन वाटणारा मुख्यमंत्री !

Chief Minister who gives one lakh acres of land to landless people!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं जितकं अवघड आहे त्याच्या कैकपटीनं ती टिकवून ठेवणं अवघड. प्रत्येकालाच हे सत्तासूत्र जमेलच असं नाही. स्वतः शरद पवारांना (Sharad Pawar) सुद्धा मुख्यमंत्रिपद (CM Post) सलग पाच वर्षे स्वतः जवळ ठेवता आलं नाही. अशी चलबिचल खुर्ची सलग ११ वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रात हरित क्रांती घडवणाऱ्या मुख्यमंत्र्याची ही गोष्ट. नाव- ‘वसंतराव नाईक’(Vasantrao Naik). यवतमाळच्या पुसदमध्ये जन्मलेल्या वसंतराव नाईकांवर महात्मा फुलेंचा आणि डेल कार्निगींचा प्रभाव होता. नागपुरात महाविद्यालयीन वयातच त्यांनी वत्सलाबाईंशी आंतरजातीय विवाह केला. पुढे त्यांना अरुंधती, अविनाश, निरंजन ही तीन मुलं झाली. १९४१ च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांचा गांधीजींशी जवळचा संबंध आला. कॉंग्रेसच्या विचारधारेने ते भारावून गेले. कॉंग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आमदार

जनसंपर्क दांडगा असल्यामुळं त्यांच्यावर कॉंग्रेसच्या पुसद तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यावेळी त्यांनी अनेक गावांत रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. १९४६ च्या पुसद नगरपालिकेच्या ते नगराध्यक्ष झाले. बापू बालक मंदिर शाळा उभारून सामान्यांपर्यंत शिक्षण पोहचवलं. ग्रेन मार्केटच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिला. यवतमाळच्या प्रत्येक नागरिकापर्यंत वसंतरावांचं नाम आणि काम दोन्ही पोहचलं याचा फायदा होणारच होता. तो झाला १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत. ते आमदार झाले त्यावेळी यवतमाळ मध्यप्रदेश राज्याचा भाग होता. राजस्व उपमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. १९५७ ते १९६० पर्यंत कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीनं त्यांची कृषिविकास पुरुष अशी ओळख बनली.

१ लाख ३७ एकर शेती भूमिहिनांना

यानंतर वसंतरावांनी मागं वळून पाहिलं नाही. बंजारा कुटुंबात जन्मलेल्या युवकानं पुढं संयुक्त महाराष्ट्राच्या कृषिमंत्रीपदापर्यंत मजल मारली. आसमान कवेत होतं पण जमीन सोडली नाही. ते परत जमिनीकडे परतले. मातीतल्या माणसांसाठी. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ३७ एकर शेती भूमिहिनांना दिली. पंचायत राज कायद्याची राज्यात मुहूर्तमेढ रोवली, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. प्रत्येकाला सत्तेत सामील होता यावं आणि हित साधता यावं अशी त्यांची इच्छा होती.

१९७२ च्या दुष्काळावर केली मात

चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका या देशांचे दौरे करून वसंतराव नाईकांनी शेतीपिकांच्या संकरित वाणांची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ओळख करून दिली. शेतकरी नगदी पिकं पिकवू लागले. ऊस आणि कापसाचे जसे उत्पन्न वाढले तसे महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणायला त्यांनी सुरुवात केली. नगदी पिकं पिकू लागली आणि कारखान्यांकडून तो माल खरेदी होऊ लागला आणि शेतकऱ्यांच्या हातात मुबलक पैसा आला तो वसंतराव नाईकांमुळच. १९७२ च्या दुष्काळानंतर सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. अशा परिस्थितीत नागरिकांसमोर अन्नधान्याचं मोठं संकट उभं राहिलं तेव्हा वसंतरावांनी देशातली पहिली रोजगार हमी योजना सुरू करण्याचं धाडसं केलं; ती यशस्वीपण राबवलीदेखील. त्यांच्या या निर्णयामुळं सात हजारांवर विहिरी, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदण्याचं काम केलं आणि ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला.

जगाचा निरोप घेतला

त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी अनेकदा वसंतरावांच्या शेतीविषयक कामाचं कौतुक केलं. वसंतरावांनी यशस्वीपणे राबवलेली रोजगार हमी योजना इंदिरांनी देशभर राबवली. शेतकऱ्यासांठी रात्रंदिन झटणाऱ्या वसंतरावांनी अखेर वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER