राम मंदिर : शिवसेनेकडून एक कोटी कधीचेच पोहचले; उद्धव ठाकरेंनी दिला पुरावा

Uddhav Thackeray & Ram Mandir

मुंबई : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्माणासाठी शिवसेनेकडून एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. मात्र यातील एक रुपयाही अजून मिळाला नसल्याचे राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास महाराज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्यानंतर आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून राम मंदिरासाठी एक कोटी दिल्याचा पुरावा सादर केला आहे.

तसेच याबाबत त्यांनी ट्रस्टलाही पत्र दिले आहे. प्रभू राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून एक कोटीचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टला पत्र पाठवलं आहे. ज्यात मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका आणि एक कोटीचा निधी कोणत्या माध्यमातून पाठवला याचा खुलासा करण्यात आला आहे. राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. ज्या वेळी अयोध्येतील विवादीत ढाचा पाडला गेला तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत होते, प्रत्येक जण आपल्या जबाबदारीपासून पळ काढत होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते ज्यांनी हे काम जर शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा गर्व आहे असं म्हटलं होतं. ही घटना तेव्हा खूप चर्चेत होती, आता ज्या वेळी मंदिर निर्माण होत आहे, तेव्हा शिवसेना मंदिर निर्माणाबद्दल आपली भावना व्यक्त करत आहे.

पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान यांची आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारो शिवसैनिकांनी राम मंदिराच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे, तशी माझीही इच्छा होती, असं मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. तसेच अयोध्या दौऱ्यानिमित्त राम मंदिर निर्माणासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर २७ जुलै २०२० रोजी आरटीजीएसने पाठवण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रात दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER