मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनफिल्ड ; पोफळी जलविद्युत प्रकल्पाची केली पाहणी

Uddhav Thackeray

रत्नागिरी :- सध्या राज्यात कोरोनाचा (Corona) प्रभाव ओसरलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडून ऑनफिल्ड  दिसत आहेत. कोरोना काळात ते मातोश्रीतूनच ऑनलाईन राज्याचा कारभार हाकत होते. तेव्हा मातोश्रीबाहेर पडत नसल्याची त्यांच्यावर नेहमी टीका व्हायची. आता त्यांनी  (Uddhav Thackeray) दौऱ्यांचा  सपाटाच सुरू केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब  पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १० च्या सुमारास कोयनानगर हेलीपॅडवर दाखल झाले. त्यानंतर मोटारीने ते पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा – ४ ची पाहणी केली. उद्धव ठाकरे हे कोळकेवाडी टप्पा-४ ला भेट देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यावेळी पोफळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोफळी धरणाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री कोयना धरणाकडे रवाना झाले. कोयना धरण परिसराची पाहणी केल्यानंतर ते विश्रामगृहात थांबणार होते. पण  दौऱ्यात अचानक बदल करून ते पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी अचानक विश्रामगृहाचा दौरा रद्द केल्यानं तिथे निवेदन देण्यासाठी आलेल्या अनेकांची निराशा झाली. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले होते की पर्यटनासाठी? असा सवाल यावेळी उपस्थितांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्रमांक-२ च्या प्रकल्पस्थळाकडे रवाना झाले. तिथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते पुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची ते पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर बांधकामाचं सादरीकरणही केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER