विमानतळ विकासामध्ये पर्यटन, उद्योग, शहर विकासाचा दृष्टिकोन ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :- पायाभूत सुविधांचा विकास एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून विमानतळांच्या विकासाकडे न पाहता त्या परिसरातील पर्यटन, उद्योग, शहरविकासाला चालना कशी मिळेल ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे. शिर्डीची आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तेथील विमानतळ टर्मिनस इमारतीचे विस्तारीकरण संकल्पनाधारित (थीम बेस्ड) पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सरकार फार काळ टिकणार नाही : रामदास आठवले

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे तेथील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. विदेशामध्ये धार्मिक ठिकाणचे विमानतळ पाहता तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन थीम बेस्ड पद्धतीने विमानळांचा विकास केल्याचे दिसून येते. राज्यातही शिर्डी, नांदेड विमानतळांसाठी थीम बेस्ड विकास पर्यटनवृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. शिर्डी विमानतळ टर्मिनसचे विस्तारीकरण अशा पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबर (एमटीडीसी) समन्वयाने काम करावे. शिर्डी विमानतळावर ‘नाईट लँडींग’ची सुविधा एप्रिलपासून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

विमानतळांचा विकास करताना तेथील शहरांशी चांगली दळणवळण यंत्रणा (कनेक्टिव्हिटी), मार्गावरील उद्योग, शहर विकासासाठी नगरनियोजन तसेच परिसरातील पर्यटन विकास साध्य करण्यासाठी नगरविकास विभाग, सिडको, एमएडीसी, एमटीडीसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी समन्वयाने काम करावे. चिपी विमानतळ (जि. सिंधुदुर्ग) लवकरात लवकर कार्यान्वित होईल यासाठी जलद गतीने कार्यवाही करा. तसेच या विमानतळालगतच्या परिसराचे नियोजित पद्धतीने शहर नियोजन करावे.

बैठकीस पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली- उगले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.