
रविवार संध्याकाळ किंवा सोमवारपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात सुरु होती. राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. राज्य सरकारने सर्व काही खुले केल्याने आणि नागरिक बेजबाबदार झाल्याने राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. या दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जास्त हादरा दिला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेला संबोधित करताना दोन दिवसात निर्णय घेऊ असे म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊनचा विचार करीत असल्याचे म्हटले जाऊ लागले होते. याची कुणकुण लागल्यानंतर बॉलिवूडमधील निर्माते कर्मचाऱ्यांची संघटना फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लॉकडाऊन लाऊ नये आणि शूटिंगची परवानगी कायम ठेवावी अशी मागणी केली होती. रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगला सशर्त परवानगी (Conditional permission for shooting) देत मुख्यमंत्र्यांनी संस्थेची मागणी मान्य केली. यामुळे बॉलिवूडकरांमध्ये आनंद पसरला आहे.
एफडब्ल्यूआयसीई ने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात म्हटले होते, गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू केल्याने बॉलिवूडला मोठे नुकसान झाले. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे रोजी रोटीचे संकट निर्माण झाले होते. यात लाखों कर्मचारी, टेक्निशियन आणि ज्युनिअर आर्टिस्ट, बॅकग्राऊंड डांसर्स यांच्यापुढे जगण्याची समस्या निर्माण झाली होती. कलाकार, निर्मात्यांनी या सगळ्यांना मदत केल्याने हे कर्मचारी जगू शकले होते. मात्र काही जणांची नोकरी गेली होती. आता पुन्हा जर लॉकडाऊन लावला तर या कर्मचाऱ्यांच्या हालाला पारावर राहाणार नाही. अनेक जण त्यांच्या घरात कमावणारे एकटेच आहेत. आता पुन्हा इंडस्ट्रीचे काम सुरु झाल्याने त्यांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र पुन्हा जर लॉकडाऊन लावला तर यांचे हाल होतील. त्यामुळे लॉकडाऊन करू नये आणि शूटिंगला परवानगी कायम ठेवावी अशी मागणी संस्थेने पत्रात केली होती.
संस्थेचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी याबाबत बोलताना सांगितले, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लॉकडाउन लागू करू नये अशी मागणी केली होती. त्यांनी आमची मागणी मान्य केली यासाठी त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्या या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लाखों कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचीही साथ, ‘लॉकडाऊन झाल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन’
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला