अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री ठाकरे यांचे मौन : अजितदादा भडकले

Ajit Pawar & Uddhav Thackeray

मुंबई :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत सोमवारी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रात सर्वात आधी कोणाची प्रतिक्रिया आली तर ती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची. दुपारी ३ वाजता अजितदादांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करणारी प्रतिक्रिया माध्यमांकडे पाठवून दिली. मात्र सायंकाळचे ७ वाजले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया मात्र आलेली नव्हती.

अजितदादा म्हणाले कोरोनावर लस शोधून शास्रज्ञांनी देशवासियांना जीवदान दिले. केंद्रीय अर्थसंकल्पाने मात्र पुन्हा एकदा देशातील जनतेला मरणाच्या दारात नेऊन उभे केले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी, कोरोनाकाळात रोजगार गमावलेले कोट्यवधी युवकांच्या पदरी या अर्थसंकल्पामुळे निराशाच आली आहे. महिला कल्याणाच्या योजना नाहीत, आयकर उत्पन्न मर्यादेत वाढ न केल्याने मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर यावेळीही अन्याय झालेला आहे. महाराष्ट्राबद्दल केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जवळ असल्याने त्यांना २५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले, महाराष्ट्राला काहीही दिले नाही या शब्दात अजित पवार भडकले.

मात्र, आता हे वृत्त लिहेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षाच आहे. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मात्र अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त करणारे विधान केले. ते म्हणाले,  देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरेच गिफ्ट मिळाले पण  महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावे लागेल. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. कोरोना काळात  केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्या पॅकेजचे काय झाले? असा सवाल करतानाच जे बजेट जाहीर झाले ते या राज्यांना कसे मिळणार हे केंद्राने जाहीर करावे असे ठाकरे म्हणाले. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेईल असे वाटत होते. पण अर्थसंकल्पातून तसे काहीच दिसून आलेले नाही.  सर्वात जास्त रोजगार निर्मिती सध्या पर्यटन क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे पर्यटनावर भर देणेअपेक्षित होते, पण त्या बाबतही काहीच तरतूद केलेली दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर, नाशिक मेट्रोसाठी भरीव निधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतानाच आजचा अर्थसंकल्प जनताभिमुख असल्याची प्रतिक्रिया दिली. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडून आता सहा तास उलटले तरी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया का नाही या बाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला तेव्हा शरद पवार, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असे राष्ट्रवादी व काँग्रेसचे दिग्गज नेते मोर्चेकऱ्यांना संबोधित करण्यासाठी गेले होते. केंद्र सरकारने कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, शिवसेनेचा एकही नेता त्या ठिकाणी गेला नाही. त्यातून  कृषी कायद्यांना शिवसेनेचा विरोध नसल्याचा एक संदेश गेला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करून सहा तास लोटले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया न येणे या विषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रावर अन्याय झाला, हे फडणवीसांनीही मान्य केले : अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER